युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती / व्हाअभिव्यक्त!
ऊंच नीच काही नेणो भगवंत, तिश्ठे भाव भक्ती देखोनिया| असे ठाम पणे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील वारकरी परंपरा ही भेदाभेद न मानणारी क्रांतिकारी चळवळ आहे. कुणीही जन्माने, वर्णाने, लिंगाने उच्च किंवा कनिष्ठ असत नाही. सर्वजण ही त्या परमात्म्याची उत्पत्ती आहे. त्यामुळे सर्वांचाच अधिकार समान आहे अशी शिकवण वारकरी सांप्रदायाने महाराष्ट्रात रुजवली.
त्याच परंपरांना राज्यकर्ते म्हणून शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी आपल्या राज्य व्यवस्थेत समाविष्ट केले होते. शिवाजी महाराज जेंव्हा अठरा पगड जाती बारा बलुतेदार सोबत घ्यायचे आणि शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एका छताखाली आणले त्यामागे सुद्धा तुकोबांचे हे चिंतन असेल का? म्हणजे जात पात न बघता योग्यता बघून महाराज आपल्या मावळ्यांना सोबत घ्यायचे. तर ज्या लोकांना शेकडो वर्षे व्यावस्थेपासून दूर ठेवले गेले अश्यांना आरक्षण लागू करून शाहू महाराजांनी मुख्य प्रवाहात सामील करून घेतले.
तुम्हाला वेदाध्ययन करण्याचा अधिकार नाही असे म्हणणाऱ्यांना ठणकावत तुकाराम महाराजांनी ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा इतरांनी (त्यांना उद्देशून) वहावा भार माथा’ असे म्हटले. आणि सर्वसामान्य लोकांसाठी वेद खुला केला. त्याच पद्धतीने वैदिक स्कूल ची स्थापना करून शाहू महाराजांनी सर्व समाजासाठी वेद अध्ययन खुले केले. ही तुलना किती बरोबर किती चूक हे बघण्यापेक्षा माझी ती श्रद्धा आहे.
माझ्या आजीमांनी, म्हणजे स्व. श्रीमंत राणीसाहेब मंगलाराजे भोसले, नागपूर सीनिअर यांनी लहानपणी विठ्ठलाची भक्ती किती साधेपणाने करता येते याचे संस्कार माझ्यावर बिंबवले होते. पंढरपूर, देहू, आळंदी, आषाढी वारी हे सर्व काही ऐकायला मिळायच. विठुरायाची भोळी भाबडी भक्ती करायला माझ्या आजीमांनी शिकवलं.
मी आज जीवनात पहिल्यांदा आषाढी वारी मध्ये सहभागी झाले. महाराष्ट्राची वारी ही उज्ज्वल परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. त्या परंपरे मध्ये सहभागी होण्याची जन्मो जन्मीची इच्छा पूर्ण झाली. छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान झाले. त्यांच्या समवेत मी आणि आमचे चिरंजीव शहाजीराजे उपस्थित होतो, ही आमच्यासाठी सुद्धा पर्वणी होती. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेंव्हा या विठ्ठले कृपा केली. ही भावना आज मनात ओतप्रोत भरलेली आहे.
वारकरी संप्रदायाने, सर्वच वारकऱ्यांनी आम्हा छत्रपती घराण्यावर जे प्रेम दाखवले त्याला शब्दात व्यक्त करू शकत नाही. हे प्रेमसुख जगात इतरत्र कुठेही अनुभवायला भेटणार नाही. पंढरीनाथ पांडुरंगाने आमच्यावर अशीच कृपा राहू द्यावी ही प्रार्थना.
राम कृष्ण हरी!
हेही वाचा: संभाजी छत्रपती सतत, अथक कार्यरत…परिश्रमी वृत्तीची तरुण कार्यकर्त्यांमध्ये चर्चा
संभाजी छत्रपती सतत, अथक कार्यरत…परिश्रमी वृत्तीची तरुण कार्यकर्त्यांमध्ये चर्चा