संपत लक्ष्मण मोरे
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री, आमदार महादेव जानकर यांच्याबद्दल मी अनेकदा लिहिलंय.साधारण २० वर्षांपूर्वी या माणसाला विट्यात पाहिलं तेव्हापासून जानकर साहेब यांच्याबद्दल मला आपुलकी वाटत राहिली आहे. अतिशय सामान्य कुटुंबातील एक तरुण मुलगा इंजिनिअरिंगची पदवी जवळ असताना नोकरी न करण्याचा विचार करतो.नोकरीचे अनेक पर्याय खुले असताना सामाजिक कामात उतरतो. सुखाचे सगळे मार्ग खुणावत असताना ज्या वाटेने कोणी जात नाही त्या वाटेने चालत राहतो.’होय मी कमांडर आहे. होय मी सत्ताधारी होणार आहे.’अशी भाषा हा तरुण अशा स्थितीत असताना करत होता,ज्या काळात हा माणसाला राज्य परिवहन महामंडळाची एसटी हेच वाहन परवडत होत.समाजाला जाग करण्याचं व्रत घेऊन चालणारा हा माणदेशी माणूस.अनेक रात्री एसटी स्टँडवर काढल्या.अनेकदा केळी खाऊन दिवस काढले. काहीवेळ बस मिळाली नाही तर चालत जाऊन मुक्कामाची ठिकाण गाठली.
राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वतःचा पक्ष या माणसाने स्थापन केला आहे. पळसावडे सारख्या गावातील एक तरुण एक पक्ष स्थापन करतो.त्या पक्षाचे कार्यकर्ते देशभर तयार होतात.महादेव जानकर यांनी घर सोडले तेव्हा एकटं होते पण त्याच महादेव जानकर यांना नेता मानणारे लोक संपुर्ण देशात आहेत. पश्चिम बंगाल,गुजरात,उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष आहे. राजधानी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे अधिवेशन झाले होते..
मेंढपाळ कुटुंबातील हा तरुण इंजिनिअर व्हायचं स्वप्न घेऊन सांगलीला गेला.डिग्री पूर्ण केल्यावर नोकरी करून संसार करेल ही आई वडिलांची अपेक्षा पण हा माणूस स्वतःचा संसार करायला जन्माला आलेलाच नव्हता.’मी पंतप्रधान झाल्याशिवाय लग्न करणार नाही.आणि घरी जाणार नाही.’ही प्रतिज्ञा केली. आणि घर सोडलं.पुन्हा पंचवीस वर्षे घरी आले नाहीत.वडील गेले तेव्हा एकदा आणि काही महिन्यांपूर्वी आई गेली तेव्हा हा माणूस घरी आलेला..आटपाडी म्हसवड रोडवर या माळावर असलेलं घर.या रोडवरून कितीदा महादेव जानकर गेले पण घरी गेले नाहीत.केवढा हा त्याग??हे जमेल का कोणाला?काही लोक जानकर साहेबांच्यावर टिका करतात पण टिका करणे सोपे पण जानकर होणे अवघड असते.हे मी ठामपणे सांगू शकतो..
आम्ही विटा आळसुंद रोडवर होतो.जानकर साहेब म्हणाले,”संपतराव,याच रोडने मी अनेकदा मोटरसायकलवरून गेलोय. या वाटेवर एक झाड होत.तिथ एक पाण्याचा हौद होता.तिथं गाडी थांबवून अनेकदा मी कपडे धुतली आहेत.मी तिथं कपडे वळवायचो आणि पुढच्या गावाला सभेला निघुन जायचो..”क्रांतीसिंह नाना पाटील यांचा हा मुलुख आहे.मी जेव्हा बीड जिल्ह्यात जातो तेव्हा तिथली जुनी लोक नानांची आठवण काढतात तेव्हा मला अभिमान वाटतो मी नानांच्या जिल्ह्यातील आहे..”
“क्रांतिवीर नागनाथ अण्णांनी माझ्यावर खूप प्रेम केलं.त्यांनी मला फिरायला गाडी घेऊन दिली होती. या भागात आलो की अण्णांची आठवण होते.मला अण्णांचा मोठा आधार होता..”
रस्त्यावरून जाताना साहेब अनेक आठवणी सांगत होते.जुन्या आठवणीत हरवणारा हा माणूस.महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वेळा कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम केलेला.मंत्री होते तरीही ते कार्यकर्त्यांच्या घरी राहत.दोन दिवसांपूर्वी जत तालुक्यातील दरीबडची गावात एका कार्यकर्त्यांच्या झोपडीत राहिले.. हा साधेपणा कोठून येतो..?राजकारणी लोक आपण बघतो.किती प्रोटोकॉल असतो. पण आजचीच गोष्ट,विट्यात त्यांच्या गाडीत गर्दी झाली.मग ते एका मोटरसायकवाल्याला सोबत घेऊन भेटीच्या ठिकाणी गेले.गणेश पवार यांच्या ऑफिसला भेट होती..
आमच्या वस्तीवर साहेब आले.आईला म्हणाले,”तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती.संपत जसा तुमचा मुलगा तसा मीही तुमचा मुलगा आहे.”असे म्हणत त्यांनी आईचे पाय धरले.एवढा मोठा नेता. एका पक्षाचा संस्थापक.हजारो कार्यकर्त्यांचा नेता. माजी मंत्री,विधानपरिषद सदस्य.माझ्या शेतकरी आईसमोर नतमस्तक झालेला.साहेबांची ती विनम्रता पाहून आम्ही सगळे गहिवरून गेलो..
गेल्या काही वर्षापासून बघतोय. महादेव जानकर हा एक विचार आहे.ब्रँड आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या विरोधातही त्यांनी संघर्ष केला.त्याअगोदर सगळ्या प्रस्थापित पक्षाच्या विरोधात लढा पुकारला.पण हा माणूस सतत सकारात्मक ऊर्जा पेरत गेला.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापासून ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत सर्व पक्षात त्यांचे संबंध चांगले राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा त्यांना,’तुमचा पक्ष आमच्या पक्षात विलीन करा.तुम्हाला मोठी संधी देतो.”असे सांगितल्यावर”साहेब माझी झोपडी असू द्या”असे सांगणारा हा माणदेशी नेता..हे सगळे किस्से ते आम्हाला सांगत होते..
“सगळ्या वाटा आडवाटा मला माहिती आहेत.मला चालत जायला आजही काही वाटत नाही.मी साधा माणूस आहे. मंत्रिपद काही दिवसाचे असते. माणुसकी अखंड टिकणारी असते..”असा विचार मांडणारा हा माणूस..
“मी जेव्हा राज्याचा पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री झालो तेव्हा मी दुधाचे दर वाढवले. कारण मीही लहानपणी म्हैसी गाई राखल्या आहेत. मला माझं बालपण आठवलं.मी दुधाचे दर वाढवले.मिळू दे चार पैसे माझ्या शेतकऱ्याला.आपण सत्तेत गेलो की आपल्या राबणाऱ्या माणसाचं भल झालं पाहिजेल..”ते सांगत होते..
“पोरांनो तुम्ही इंग्रजी शिका.कलेक्टर व्हा.शिकलो तर किंमत आहे..”जमलेल्या पोरांना त्यांनी सांगितले..
“मी शांतिनिकेतन सांगली येथे शिकत होतो.मला वसंतराव दादा पाटील यांच्या हस्ते बक्षीस मिळाले, पी बी पाटील सरांनी त्यांना सांगितलं,’गरीब घरातील हुशार पोरगा आहे. मग दादांनी मला हजार रुपये दिले. मला गाडीत बसवून घरी घेऊन गेले.मला त्यांनी प्रेमाने जेवायला घातले.आणि तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव देशमुख यांना सांगीतले,’या पोराला शाळेत नेऊन सोड.देशमुख साहेबांनी मला त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीतून शाळेत नेऊन सोडले.. मी ज्यादिवशी मंत्री झालो तेव्हा शिवाजीराव देशमुख उपस्थित होते. त्यांच्या पाया पडलो आणि ही आठवण सांगितली.साहेब गहिवरून गेले..
अशा गोष्टी सांगणारा हा राजकारणातील गोष्टीवेल्हाळ माणूस.खूप काही सांगत राहतो.राजकारणात राहूनही भाबडा असलेला हा माणूस.जे पोटात ते ओठावर आणणारा नेता.तळहातावरील रेषासारखा महाराष्ट्राची माहिती असलेला जननेता.परवाचा मुक्काम दरीबडचीत झोपडीत होता,काल विट्यात आणि आज कुठे माहिती नाही..?येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा ।कोणावरी न बोझा या झोपडीत माझ्या।अस साधं जगणं आणणारा हा माणूस..असा निर्मळ माणूस आज या राजकारणात आहे.. साडेअकरा वाजता एका माऊलीपुढे नतमस्तक होणारा हा माणूस कोल्हापूरमध्ये प्रेसला आत्मविश्वासाने सांगतो,”होय मला पंतप्रधान व्हायचं आहे.मी कोणाचीही मदत घेऊन पण पंतप्रधान होईल ”
कडवे गुलाम आणि कडवे भक्त होण्याचा हा काळ.. या काळात अशी स्वप्ने बघत ती सामान्य माणसाच्या मनात पेरणारा हा माणूस..त्यांचे स्वप्न पूर्ण होईल की नाही माहिती नाही मात्र स्वप्ने बघू दिली न जाण्याच्या काळात हा माणदेशी माणूस दिल्लीच्या दिशेने जायचं म्हणतोय.त्याला शुभेच्छा..