सुमेधा उपाध्ये / अध्यात्म
कर्मयोगी हा खऱ्या अर्थाने दुसऱ्यासाठी कर्म करणारा असतो. जो जन्मास आलाय त्या कोणासही कर्म करणं चुकवता येत नाही. आता ही कर्म स्वत:साठी स्वत:च्या नात्यांसाठी करावयाची की व्यापक समाज हितासाठी करायची याची निवड विवेकपूर्ण करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा एखादा जीव दुसऱ्याच्या हितासाठी किंवा व्यापक समाज हितासाठी कर्म करीत असतो. निष्काम अंतकरणाने कर्म करीत असतो, आपण केलेल्या कर्मांना तो भगवंताच्या चरणी अर्पण करतो. प्रत्येक कर्मात ‘मी’पणा न आणता ते भगवंताच्या मर्जीने झाले आहे आणि निमित्त आपण आहोत हे मनापासून मानतो आणि म्हणूनच ते सर्व तो भगवंताच्या चरणीच अर्पण करतो अशा व्यक्तिस आपण कर्मयोगी म्हणत असतो. अलीकडे काही प्रमाणात कर्मयोगी या शब्दाची व्याख्या सोयीने बदलली जाते. मनात स्वार्थ बाळगून केलेल्या कर्मांचा कर्तेपणा स्वत:कडे घेऊन आपण कर्मयोगी आहोत असा गवगवा करण्यात येतो.
कित्तेकदा कर्मयोगी या शब्दाची नेमकी व्याख्या न समजून घेता हा शब्द आपल्या नावाआधी लावण्याची घाई असते. कर्मयोग पूर्णावस्थेला गेल्यानंतर सर्वकर्मसंन्यास आहे. कर्मयोगी कर्म करतो ते स्वत:साठी नसतंच. कोणतंही कर्म करणं म्हणजे कर्मयोग होत नाही. कर्मयोग या शब्दातील योग हा शब्द खूप महत्वाचा आहे. योगयुक्त कर्म केलं तरच ते भगवंताची प्राप्ती करून देतं. भगवंताच्या चरणी बुद्धी स्थिर राहणं हा योग आहे. योगाशिवाय केलेलं कर्म कितीही उत्तम असलं तरीही ते भगवंताची प्राप्ती होण्यास कमी आहे. आसक्ती पूर्णत: संपल्याशिवाय अंत:करणात भगवंत स्थिर कसा होणार? म्हणूनच गीतेत भगवंत म्हणतात की- योगस्थ होऊन कर्म कर, भगवंताच्या चरणी बुद्धी स्थिर ठेव त्यानंतर झालेली कर्म महत्वाची ठरतात. भगवंताच्या चरणी बुद्धी स्थिर ठेवून कर्म करणं असं घडलं तर त्याचा अर्थ असा होईल की आता माझी कोणतीच ईच्छा नाही, मनात स्वत:साठी काही कामना उरलेली नाही तेव्हा ती कर्म निष्काम कर्म होतील.
ज्ञानदेव म्हणतात- आईकें योगी आणि सन्यासी जनीं|
हे एकचि सिनाने झणीं मानी|
एरव्ही विचारिजती जंव दोन्ही | तंव एकचि ते ||
जो कर्मयोगी असतो तोच सन्यासी असतो. एकाच व्यक्तीची दोन नाव असावीत त्याप्रमाणे हे आहे. कामना सोडून जो कर्म करतो तोच कर्मयोगी, तोच कर्मसन्यासी.
आपल्या कर्मांच्या परिणामांची चिंता न करता समाजाच्या किंवा दुसऱ्याच्या व्यापक हितासाठी कार्यरत असलेली व्यक्तिच कर्मयोगी असते. सकर्म आणि निष्कामकर्म असे दोन प्रकारचे कर्म असतात. काहीतरी मिळवण्याच्या लालसेनं केलेली कर्म ही निश्चितच सकाम कर्म होत आणि कोणत्याही फळाची अभिलाषा न धरता केलेली कर्म ही निष्काम कर्म असतात. ती सर्व भगवंताला अर्पण केली जातात. त्यात काहीही मिळवायचंच नसतं. कर्म फळ प्रारब्ध होऊन पुढील जन्मांमध्ये सोबतच येत असतात. त्यामुळं आपली कर्म जेव्हा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि त्यात स्व कामना नसते. फळाची अपेक्षाच नसते त्यामुळं ती प्रारब्ध होऊन जीवास फळ देत नाहीत. ज्याचा सर्व भार भगवंतानं उचलला आहे, त्या जीवाचा उद्धार हा निश्चित होत असतो. कर्मगतीची तीव्र धार अशा कर्मयोगींसाठी थोडीतरी बोथट होत जाते. जीवाला त्याची झळ लागण्याआधीच भगवंत त्याची धार बोथट करीत जातो. त्यामुळं कर्मयोगी होऊन कर्मसंन्यासी होण्याची प्रवृत्ती वाढीस लागण्याची जीवास आवश्यकता असते.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)
Nice
Sunder