मुक्तपीठ टीम
नव्या आयटी नियमांवरुन सुरु असलेल्या सरकार आणि सोशल नेटवर्किंग वेबसाइट ट्विटरमधील वाद अद्यापही संपलेला नाही. संसदेच्या माहिती तंत्रज्ञान समितीने लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुक आणि गुगलला बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत नागरिकांच्या हक्कांचे रक्षण आणि ऑनलाइन मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासंबंधित चर्चा केली जाणार आहे. ही बैठक २९ जूनला होणार आहे.
सरकारचे ट्विटरकडे दुर्लक्ष
या बैठकीत संसदीय समितीने फेसबुक आणि गुगलला बोलावले आहे. २५ मे रोजी लागू करण्यात आलेले नवे आयटी नियम ट्विटरने अद्याप लागू केलेले नाहीत. नुकतेच ट्विटरचे तक्रार अधिकारी धर्मेंद्र चतुर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अशात सरकार ट्विटरकडे दुर्लक्ष करुन इतर प्लॅटफॉर्मसोबत चर्चा करीत आहे.
खास मुद्द्यांवर होणार चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, संसदीय समिती काही खास मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. तसेच पुढील बैठकीत दुसऱ्या सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सना आमंत्रित करणार आहे. ज्यात यूट्यूब सह इतर नेटवर्किंग वेबसाइट सहभागी होतील. त्यामुळे आता ट्विटर संबंधित सरकार काय निर्णय घेतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ट्विटर सहमत..पण वाद अद्याप सुरूच
दरम्यान, सरकारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत फेसबुक आणि गुगलच्या नावांचा समावेश आहे. ट्विटरला या बैठकीत बोलविण्यात आलेले नाही. मात्र, यावर ट्विटरकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. ट्विटरने आटीच्या नव्या नियमांना सहमती दर्शवली असली तर नियमांवरुन सरकार आणि ट्विटरमधील संघर्ष आजूनही सुरुच आहे.