मुक्तपीठ टीम
घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्याबाबत स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी डिसेंबर २०२० मध्ये अध्यक्ष – स्थापत्य समिती (उपनगरे) यांना पत्र दिले होते. जानेवारी २०२१ च्या कार्यक्रम पत्रिकेवर सदर विषय आला असता तो अभिप्रायासाठी महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला. जून २०२१ मध्ये याच उड्डाणपुलाला ‘सुफी संत सुलतानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोहिनुद्दीन सुफी चिश्ती – अजमेरी’ असे नाव द्यावे अशा आशयाचे पत्र शिवसेनेचे शेजारील मतदार संघाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिले होते. त्यावर मोठा वादंग निर्माण झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे सदर पुलाचे नामकरण करण्याबाबत स्थापत्य समितीत सदर प्रस्ताव १८ जानेवारी २०२१ रोजी महापालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला.
या प्रस्तावावर अभिप्राय देताना महापालिका आयुक्त सदर प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतील अशी अपेक्षा होती. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या राज्यात प्रशासनातर्फे सदर विषयाबाबत दिलेल्या अहवालात घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचे काम सुरू असुन हे काम अद्याप पुर्ण झालेले नसुन उड्डाणपूल निर्माणाधिन आहे.सद्यस्थिती पाहता पुलाचे काम पुर्ण होण्यास अजुन अवधी लागणार आहे, यास्तव सदर पुलाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य होत नाही असा आश्चर्यकारक अभिप्राय दि.२१ जुन २०२१ रोजी दिलेला आहे.
प्रमुख अभियंता (पुल विभाग) यांच्याकडे आभासी बैठकीत विचारणा केली असता सदर उड्डाणपुलाचे काम १५ ऑगस्ट २०२१ पुर्वी पुर्ण होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्री. तांबेवाघ यांनी सभागृहास दिली. आजपासुन १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत केवळ दीड महिना बाकी आहे. मग अशा वेळी प्रशासनाने निर्माणाधीन पुल पूर्ण होण्यास अजून बराच अवधी लागणार आहे, असे मोघम उत्तर का दिले? या प्रस्तावाबाबत प्रशासनाने सकारात्मक उत्तर दिले असते तर स्थापत्य समिती (उपनगरे) मध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला असता आणि नंतर महापालिका सभागृहामध्ये मंजूर झाला असता. यासाठीही महिनाभर कालावधी लागला असता. आणि १५ ऑगस्ट २०२१ भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिना दिवशी मुंबई उपनगरातील घाटकोपर – मानखुर्द जोड मार्गावरील शिवाजी नगर येथुन जाणाऱ्या एका मोठ्या पुलास महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल’ असे नामकरण करता आले असते.
सदर प्रस्ताव स्थापत्य समिती (उपनगरे) च्या २८ जून २०२१ रोजीच्या सभेत चर्चेला आला असता भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमकपणे या प्रस्तावात मंजूर करण्यासाठी उपसूचना मांडून सदर उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असेच नामकरण करण्यात यावे असा आग्रह धरला आणी शिवसेनेला कोंडीत पकडले.
यावेळी अध्यक्षांनी उपसूचना मतास टाकणे अपेक्षित होते. परंतु गोंधळलेल्या शिवसेनेच्या स्थापत्य समिती अध्यक्षांना व नगरसेवकांना काहीच सुचेनासे झाले. त्यामुळे ते असबंध प्रश्न विचारू लागले. शिवसेनेचे माजी स्थापत्य समितीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आणि तुळशीराम शिंदे यांनी हा प्रस्ताव यापूर्वी १८ जानेवारी २०२१ रोजी मंजूर झाला असतांना पुन्हा कार्यक्रम पत्रिकेवर का आला? असा विचित्र प्रश्न उपस्थित केला. प्रत्यक्षात सदर प्रस्ताव १८ जानेवारी २०२१ रोजी आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. त्यावर आयुक्तांच्या नकारात्मक अभिप्रायासह हा प्रस्ताव जून २०२१ च्या कार्यक्रम पत्रिकेवर आला. आयुक्तांचे अभिप्राय नकारात्मक असल्यामुळे प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक महादेव शिवगण यांनी सदर नामकरण मंजूर करण्यासाठी सकारात्मक उपसूचना मांडली. परंतु दुर्दैवाने सदर उपसुचनेस शिवसेना नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी तीव्र विरोध केला. यावरून शिवसेना सदस्यांचे सभागृह कामकाजाबाबत अज्ञान समिती सभागृहात प्रगट झाले. माजी स्थापत्य समिती अध्यक्ष असो की शिवसेना नगरसेविका असो यांनी आयुक्तांचे नकारात्मक अभिप्राय वाचलेच नव्हते व त्यामुळे भाजपची सकारात्मक उपसूचना त्यांना कळलीच नाही. तीच अवस्था सध्याच्या शिवसेनेच्या स्थापत्य समिती उपनगरेच्या अध्यक्षांचीही झाली. अध्यक्षांनी सभागृहाच्या पटलावर मांडलेली उपसूचना मतास टाकणे कायद्यानुसार बंधनकारक असतांनाही सदर उपसूचना मतास न टाकता सभागृहाच्या कामकाजाची कार्यपद्धती पायदळी तुडवत संपूर्ण विषयच नॉट टेकन केला व आज मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी शिवसेनेच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नामकरण मंजूर होऊ शकले नाही.
अध्यक्षांनी विषय नॉट टेकन केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा देत शिवसेना अध्यक्षांचा निषेध करत सभात्याग केला.
शिवसेनेने महाविकास आघाडीत जातांना हिंदुत्व तर सोडलेच आहे परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांचाही विसर पडला आहे काय? छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल” नामकरणाबाबत भाजपची उपसूचना मंजूर न करता विषय नॉट टेकन करतांना शिवसेनेला लाज वाटली नाही का? असा असा परखड सवाल याबाबत प्रतिक्रिया देतांना भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी विचारला.
महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत शिवाजी नगर येथील उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नामकरण करण्यास शिवसेनेच्या मनात गोंधळ – संभ्रमावस्था अथवा सुफी संतांचे नाव देण्याचा छुपा डाव असणे हे मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली.