मुक्तपीठ टीम
मुंबईतील बोगस लसीकरणाची दखल आता मुंबई उच्च न्यायालयाने घेतली असून मुंबई मनपाला खडेबोल सुनावले आहे. कांदिवली येथील बोगस लसीकरणाचे प्रकरण उजेडात आल्यानंतर मुंबईत बोगस लसीकरण शिबिरांत २,०५३ पेक्षा जास्त लोकांना लस टोचण्यात आली आहे. असे ९ कॅम्प आयोजित झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बनावट लसीकरणाच्या प्रकरणात मुंबईतील चार वेगवेगळ्या ठिकाणांवर घेण्यात आलेल्या लसीकरण शिबिरांविरोधात चार एफआयआर नोंदवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी उच्च न्यायालयात दिली आहे. तसेच या बनावट लसीकरणाच्या माध्यमातून एकूण दोन हजार ५३ नागरिकांना फसवण्यात आले, असल्याची धक्कादायक माहिती सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात माहिती दिली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे
- मुंबईतील कांदिवली, वर्सोवा, खार, बोरिवली अशा वेगवेगळ्या ठिकाणी बनावट लसीकरणाची शिबिरी घेण्यात आली होती.
- एकाच टीमच्या लोकांनी नऊ वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरणाची शिबिरे घेतली होती.
- त्याप्रमाणे मुंबई मनपानं २३ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती अॅड अनिल साखरे यांनी उच्च न्यायालयाने दिली आहे.
- लसीकरणाचे एक शिबिर ज्या आदित्य कॉलेजमध्ये झाले त्या कॉलेजचे आशिष मिश्रा यांनाही बोरिवलीच्या एफआयआरमध्ये आरोपी केले आहे.
- तर, मनीष त्रिपाठी हा आरोपी फरार आहे.
- आतापर्यंत चारशे साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.
तक्रारीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा
- मुंबईत सुरू असलेल्या बनावट लसीकरणाप्रकरणी मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
- अशाप्रकारचे लसीकरण मुंबईत कुठेही सुरू असल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
- नागरिकांनी याबाबतची माहिती देण्यासाठी २२६२५०२०, २२६२७९८३, २२६२३०५४ किंवा १०० क्रमांक तसेच स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.