मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. दलित अत्याचार रोखण्याकडे महाविकास आघाडी सरकारने अधिक लक्ष द्यावे यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रवीण मोरे, सचिन आठवले आणि सतीश निकाळजे यांचा ही समावेश होता.
महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून राज्यात २०० हुन अधिक दलित अत्याचाराची प्रकरणे घडली आहेत. नुकतेच परभणी येथील खेरडा गावात दलितांना पिण्याचे पाणी देण्यास नकार देऊन शिवीगाळ आणि मारहाण करण्याचे निंदनीय प्रकार घडला आहे. या प्रमाणे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यास जातीवाचक अश्लील शिवीगाळ करण्याचा प्रकार समाज माध्यमांत उघडकीस आला आहे. दलितांवर होणारे हे अत्याचार रोखावेत. दलितांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी रिपाइं युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड आणि प्रवीण मोरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देऊन केली आहे.