मुक्तपीठ टीम
आज राज्यातील अनेक विषय प्रलंबित आहेत. ओबीसीच्या राजकीय आरक्षण प्रश्न ऐरणीवर आहे, मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर आंदोलन होत असुन पदोन्नती आरक्षण संदर्भात दलित समाजामध्ये संतप्त भावना उफाळून येत आहे. असे अनेक सामाजिक विषय या ठिकाणी आहेत. या प्रलंबित विषयाचा तोडगा काढण्याकरीता अधिवेशन जास्त दिवसाचे असेल तर तपशीलवार चर्चा अधिवेशनात करता येईल त्यामुंळे राज्यसरकारने कोरोनाचे कारण न सांगता अधिवेशन आटपण्याचं काम करू नये. किमान पंधरा दिवस तर अधिवेशनाचा कालावधी असावा, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
माध्यमांसोबत पावसाळी अधिवेशन संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, वर्ष दीड वर्षांच्या कालावधीत राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली असुन त्यामुळे, पुनः एकदा सर्वसामान्य लोकांचे उद्योगधंदे चालू होऊन, रोजी रोटी नोकऱ्याच्या माध्यमातून स्थिरता आणण्याची आवश्यकता आहे. तसेच बी बियाणे, अतिरिक्त भाव, कोकण संबंधित अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. दोन्ही चक्रीवादळामुळे कोकण आज उध्वस्त झाला आहे. हे सर्व प्रश्न विधिमंडळाच्या सभागृहात चर्चेत येणं आवश्यक आहे. ज्या आधारे निर्णय घेणं सरकारला सोप्पं होऊ शकते, असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक विषयांवर चर्चा करण्याकरीता पंधरा दिवसाचे अधिवेशन होण्याची आवश्यकता आहे. भाजपच्या वतीने आम्ही पावसाळी अधिवेशनाचा कालावधी जास्त दिवसाचा ठेवण्याची मागणी करणार आहोत, असे दरेकर यांनी सांगितले.