मुक्तपीठ टीम
नाशिकमध्ये गंगापुररोडवरील मॅरेथॉन चौकात संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा मूक आंदोलन झालं. सोमवारी सकाळी ९ वाजता आंदोलनाला सुरूवात झाली होती. कोल्हापूरनंतर नाशिकमध्ये दुसरे आंदोलन झाले. या यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चास्थळी हजेरी लावत आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासह १५ आमदारांनी आंदोलनाला भेट देऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारी भूमिका मांडली.
आंदोलकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केल्याचे दिसून आले. अनेकांनी काळ्या रंगाची वेशभूषा केली होती. आंदोलनस्थळी मराठा मूक आंदोलनाचे समन्वयकही सहभागी झाले होते.
“आपण इथं आलात, आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. नाशिकच्या पुण्य नगरीतून मी सांगू इच्छितो की, मी फक्त मराठ्यांचं नेतृत्व करत नाही आहे, मी मराठा समाजाच्या माध्यमातून एक निमित्त आहे, शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका एकत्र कशी आणता येईल, हा माझा दृष्टीकोन आहे. संपूर्ण बहुजन समाजच कसा एकत्र राहू शकतो, हा माझा दृष्टीकोन आहे”, असे संभाजीराजेंनी म्हटले.
नाशिकमधील संभाजी छत्रपतींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे.
- पुनर्विचार याचिका हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग ३३८ ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल.
- या आयोगाच्या माध्यमातून राज्यपाल, तिथून केंद्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मग संसदेत असाच पर्याय आहेत.
- राज्य सरकारच्या हातात असलेल्या आमच्या मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने करावी.
“कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन हे सुरुच राहणार आहे. हे आंदोलन ३६ जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे”, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.