मुक्तपीठ टीम
अनुराधा पौडवाल म्हटले की समोर येतो तो सात्विक चेहरा आणि कानातच नाही तर मनातही गुंजू लागतो गोड आवाज. अप्रतिम असा. गेली अनेक वर्षे अनुराधा पौडवाल सुर्योदय फांऊडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात.
आता कोरोना संकटातही जी आवश्यक ती प्रत्येक मदत करण्याचा अनुराधा पौडवालांचा प्रयत्न होता. मग रामनगरी अयोध्येला ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करणे असो, वा सामान्य गरजवंतांसाठी मदत करणे. अनुराधा पौडवाल नेहमी सक्रिय असतात. नुकत्याच त्यांनी पनवेल महापालिकेला दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट दिले. पालिकेच्या आरोग्य विभागाला ऑक्सिजन मशीन सुपूर्द करून अनुराधा पौडवाल यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सुर्योदय फाउंडेशनचे सेक्रेटरी विवेक मातोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पूनम जाधव, श्रीकांत म्हात्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अनुराधा पौडवालांचे सामाजिक कार्य
- आपत्कालीन परिस्थितीत शासनाला नेहमीच मदतीचा हात पुढे करत १९८५पासून सुर्योदय फाउंडेशन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कार्यरत आहे. कोरोनाच्या महाभयंकर काळात मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासला.
- त्यामुळे ऑक्सिजन अभावी असंख्य रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.
- ही अडचण लक्षात घेऊन सर्वोदय फाउंडेशनच्या सर्वेसर्वा तथा जगप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी वैद्यकीय उपकरणे भेट स्वरूपात दिली जात आहेत.
- पनवेल महापालिकेला ५ लिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सुपूर्द करण्यात आले.
तसेच ज्या-ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्याठिकाणी सुर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य अविरतपणे सुरू राहील, असा विश्वास सुर्योदय फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केला. अनुराधा पौडवाल यांनी स्वतः पनवेल महापालिकेत येऊन सुर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर दिल्याबद्दल पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी त्यांचे आभार मानले आहेत.