मुक्तपीठ टीम
आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यासाठी करिअरच्या चांगल्या संधी येत आहेत. आयटी क्षेत्रातील पाच कंपन्या चालू आर्थिक वर्षात ९६,०००हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्त करतील. अलीकडेच बँक ऑफ अमेरिकेने एका अहवालात असा अंदाज व्यक्त केला आहे की, स्वयंचलित यंत्रणा वाढल्यामुळे २०२२ पर्यंत सॉफ्टवेअर कंपन्या ३० लाख कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकतील. त्यामुळे काहीसी अनिश्चितता निर्माण झालेली असतानाच नॅसकॉमने आयटी क्षेत्रात नव्या संधींचे आशादायी चित्र मांडले आहे.
नॅसकॉमचा सकारात्मक अंदाज
• तंत्रज्ञानाचा विकास आणि स्वयंचलित यंत्रणा वाढीमुळे पारंपारिक आयटी नोकऱ्या व भूमिकांचे स्वरूप सर्वांगीणदृष्ट्या विकसित होईल.
• त्यामुळे नवीन नोकर्या तयार होतील.
• आयटी क्षेत्राने २०२१ मध्ये १ लाख ३८ हजार संधी दिल्या आहेत.
• २०२१-२२ या आर्थिक वर्षात ९६ हजाराहून अधिक लोकांना आयटी कंपन्यांत नोकरीची संधी मिळू शकतील.
अलीकडेच बँक ऑफ अमेरिकेने एका अहवालात म्हटले आहे की, २०२२ पर्यंत देशांतर्गत सॉफ्टवेअर कंपन्या ३० लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकतील. यामुळे या कंपन्यांची १०० अब्ज डॉलर्सची बचत होईल. नॅसकॉमच्या मते, देशांतर्गत आयटी क्षेत्रात जवळपास १ कोटी १६ लाख लोक काम करतात, त्यातील ९० लाख लोक कमी कौशल्य सेवा आणि बीपीओ सेवांमध्ये आहेत.