मुक्तपीठ टीम
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी राज्यातील सर्व इयत्ता दहावी, बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे, असा आदेश दिला. असा आदेश दिल्यानंतरही अद्याप शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. यामुळे शाळेत पोहोचण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. यामुळे संतप्त शिक्षकांनी दहावी, बारावीच्या निकालावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.याबद्दल त्यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले आहे.
पत्रात त्यांनी लिहिले आहे की, दहावी, बारावीचा निकाल वेळेत लागावा यासाठी अनेक शिक्षक स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून, दंड भरून लोकलेने प्रवास करतात. जर सरकार पास उपलब्ध करून देणार नसेल तर आम्ही १०वी, १२वीच्या निकालांवर बहिष्कार टाकू असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी आपणास आम्ही भेटून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना ट्रेन प्रवासाची मुभा द्यावी, अशी विनंती केली होती. परंतु आजतागायत कार्यवाही झालेली नाही. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार आणि सचिव असीम गुप्ता यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी शिक्षकांना ट्रेनची परवानगी देता येणार नाही, मुंबई जोवर लेव्हल ३ मधून लेव्हल २ मध्ये जात नाही तोवर ट्रेन प्रवासाची परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट केले. याचा आम्ही निषेध करतो.
म्हणून शिक्षक भारतीने असा निर्णय घेतला आहे की, १०वी, १२ वी निकाल प्रक्रियेवर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. निकालास उशीर झाल्यास याला आम्ही जबाबदार नाही. त्याला सरकार जबाबदार असेल. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.