जगदिश ओहोळ / व्हाअभिव्यक्त!
महाराष्ट्रात आरक्षणासाठी मराठा समाजाकडून आजवर ५८ मोर्चे काढण्यात आले. त्या ५८ मोर्चात जे नव्हतं ते कोल्हापूर मोर्चात होतं. ते म्हणजे ‘नेतृत्व’!
५८ मोर्चे हे ठोस नेतृत्वा शिवाय सर्वसमावेशक निघाले. अनेकवेळा समाजातील तरुणींनी या मोर्चाचं नेतृत्व केल्याचं निदर्शनास आलं. लाखो लोकं एका मागणीसाठी रस्त्यावर येतात, असे ५८ मोर्चे होतात, खरंतर या इतक्या मोठ्या सामाजिक संक्रमानातून एक तरी खंबीर नवं मराठा नेतृत्व जन्माला येणं मराठा समाजाच्या अधिक हिताचं झालं असतं. पण तसं झालं नाही , की कोणी होऊ दिलं नाही.? हा ही सवाल आहे.
मी २०१८ मध्ये ही लिहिलं होतं ‘ज्या समूहाला योग्य नेतृत्व नसतं, तो समूह म्हणजे फक्त गर्दी असते, तो समूह नावाड्याविना दिशाहीन झालेल्या गलबतासारखा असतो.’ त्यामुळे कोणत्याही आंदोलनाला नेतृत्वाची गरज असते. आंदोलनात किती गर्दी होती.? आंदोलन किती मोठं झालं.? या बरोबरच तुलनेत अधिक महत्वाचं हेही असतं की आंदोलनाचं नेतृत्व कुणी केलं.? ती गरज व पोकळी आज खासदार संभाजीराजे यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला.
पण आता या लढाईत पुढच्या काळात ते आपली ‘राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका’ यांचा नेमका कसा मेळ घालतात.? समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या पूर्तीसाठी नेमकं कसं धोरण आखातात? समाजाची ही लढाई ते ताकतीने लढतील का.? जिंकतील का.? वेळ पडलीच तर मराठा आरक्षणासाठी केंद्राशी भांडताना खासदारकी लाथाडतील का.? याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधले आहे.
आजच्या आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, खासदार उपस्थित होते, हे तर एका बाजूला आहेच, पण या मूक मोर्चाल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज ऍड प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणे आणि त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून खासदार संभाजीराजे यांना प्रत्यक्ष मैदानात येऊन पाठिंबा देणे ही संभाजीराजे यांच्या नव्या सामाजिक, राजकीय समीकरणांची नांदी आहे.
गावगावात मराठा – बौद्ध समाजात जो एकप्रकारचा तणाव होता, तो आपोआप कमी झाल्याचे खा.संभाजीराजे व ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या आजच्या या सामाजिक युतीतून नक्कीच दिसून येईल.
(जगदिश ओहोळ हे महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते आहेत.)
हेही वाचा: शाहू महाराजांचा प्लेगच्या साथीशी सामना…आजच्या राज्यकर्त्यांसाठीही मार्गदर्शक असा!
शाहू महाराजांचा प्लेगच्या साथीशी सामना…आजच्या राज्यकर्त्यांसाठीही मार्गदर्शक असा!