मुक्तपीठ टीम
कोरोना कालावधीत लोकांना मदत करणारा सुपर हिरो म्हणून प्रतिमा तयार झालेल्या अभिनेता सोनू सूदसाठी नव्या समस्या तयार होताना दिसत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तुटवडा भासत असलेल्या काही कोरोना औषधांच्या खरेदी व पुरवठ्यातील सोनू सूदच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला दिले. त्याचवेळी वांद्रे पूर्वमधील कॉंग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्याविरूद्धही चौकशीचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
न्यायमूर्ती एस.पी. देशमुख आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.
न्यायालयाने काय म्हटले?
- अभिनेता सोनू सुद, आमदार झिशान सिद्दीकी यांच्या प्रकरणात सुनावणी झाली.
- कोरोना संकटात त्यांनी स्वत:ला मसिहा दाखवले.
- औषधे बनावट आहेत की नाही, आणि पुरवठा कायदेशीर आहे की नाही याची तपासणीही केली नाही.
- त्यामुळे त्यांची चौकशी करा.
सोनू सुदची चौकशी, आमदार सिद्दीकीप्रकरणी मात्र औषध पुरवणाऱ्यांवरच गुन्हा!
- अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने चॅरिटेबल ट्रस्ट बीडीआर फाउंडेशन आणि त्याचे विश्वस्त यांच्याविरूद्ध आमदार झिशान सिद्दीकी यांना रेमडेसिव्हिर औषध पुरवण्याच्या संदर्भात माझगाव दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे.
- कुंभकोणी यांनी दावा केला की, सिद्दीकी केवळ ज्या नागरिकांशी संपर्क साधत होते त्यांनाच औषधे दिली जात होती, त्यामुळे अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
- ते म्हणाले की, सोनू सूद यांनी गोरेगाव येथील लाइफलाईन केअर हॉस्पिटलमधील अनेक औषधांच्या दुकानातून औषधे घेतली. फार्मा कंपनी सिप्लाने या केमिस्टना रेमडेसिविर पुरविले होते.
- या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे.
- आता न्यायालयाच्या आदेशामुळे आमदार झिशान सिद्दीकींचीही व्यवस्थित चौकशी करावी लागेल.