मुक्तपीठ टीम
कोरोना काळ वगळला तर भारतात सर्वाधिक बळी जातात ते रस्त्यावरील अपघातातच. अपघाती मृत्यूची संख्या कमी ठेवण्यासाठी अपघात कमी करणे आवश्यक आहे. अपघातांचे एक प्रमुख कारण असते ते ड्रायव्हरला लागणाऱ्या झोपेचे. ड्रायव्हरला डुलकी आणि खात्री अपघाताची असे काही उगीच म्हणत नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्रातील परिवहन विभागाने ट्रकमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हे कॅमेरे ड्रायव्हरला डुलकी लागताच ते ओळखून जागे करतील.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा विभाग लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रक कॅमेरे सादर करणार आहे. जे महामार्गावर ट्रक चालकांना जागे ठेवतील आणि अपघात होण्यापासून रोखू शकतात. महामार्गांवरील अपघातांचे एक कारण म्हणजे वाहन चालवताना चालकांना झोप लागणे, हे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
या वर्षाच्या सुरुवातीला रस्ता सुरक्षा कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिवहन विभागाला असे तंत्रज्ञान आणण्यास सांगितले होते, जे चालकांना जागे ठेवेल आणि अपघात रोखेल. त्यासाठी आता परिवहन विभागाने एनआयसीशी करार केला आहे. एआय आणि कॅमेऱ्यांसमवेत ड्रायव्हर्सला झोप येत असेल तर ते ओळखून सावध करण्यासाठी योजना आखली आहे.
ते पुढे म्हणाले की, सॉफ्टवेअरचे अंतिम काम सुरू आहे. महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्री व अन्य अधिकाऱ्यांसमोप सादरीकरण करण्यात येईल.