मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार्या प्रवाशांना क्वारंटाईन न करता होम क्वारंटाईनचे लेटर आणि शिक्के मारुन पाठविणार्या आणि त्यामोबदल्यात प्रवाशांकडून पाच ते दहा हजार रुपयांची लाच घेणार्या तिघांना शुक्रवारी सहार पोलिसांनी अटक केली. त्यात महानगरपालिकेचा एक इंजिनिअर दिनेश गांवडे, दोन खाजगी इसम अश्रफ सारंग आणि विवेक सिंग यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी बोगस लेटर, शिक्के आणि सुमारे दिड लाख रुपयांची कॅश जप्त केली आहे.
अटकेनंतर या तिघांनाही शनिवारी अंधेरीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. महानगरपालिकेच्या इंजिनिअरलाच अशाच प्रकारे लाच घेऊन विदेशातून येणार्या प्रवाशांना सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मनपा अधिकार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. विदेशात येणार्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून राज्य शासनाने विदेशातून येणार्या प्रत्येक प्रवाशांना सक्तीने क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले होते, काही दिवसांच्या क्वारंटाईननंतर त्यांना घरी पाठविले जात होते, हा शासकीय नियम वजा आदेश असतानाच काहीजण विदेशातून येणार्या प्रवाशांना होम क्वारंटाईनचे बोगस लेटरवर शिक्के मारुन देतात, प्रत्येक प्रवाशांकडून पाच ते दहा हजार रुपयांची लाच घेतली जात असल्याची माहिती सहार पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याची शहानिशा सुरु केली होती, यावेळी पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा लावून या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करुन महानगरपालिकेचा इंजिनिअर दिनेश गांवडे, त्याचे दोन सहकारी अश्रफ सारंग आणि विवेक सिंग यांना रंगेहाथ अटक केली. पोलीस तपासात दिनेश हा महानगरपालिकेत इंजिनिअर म्हणून कार्यरत त्यांनीच बोगस लेटर आणि शिक्के बनविले होते, काही प्रवाशांना क्वारंटाईन व्हायचे नव्हते, थेट घरी जाण्यासाठी म्हणजे होम क्वारंटाईन करण्यासाठी त्यांच्याकडून ही टोळी पैशांची मागणी करीत होते, प्रवाशांकडून पाच ते दहा हजार रुपये घेतल्यानंतर त्यांना बोगस लेटरवर शिक्के मारुन होम क्वारंटाईन केले जात होते.
दिनेश हा पाच दिवसांपूर्वी तिथे कर्तव्यावर हजर झाला होता. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून दिड लाख रुपयांची कॅश, बोगस लेटर, शिक्के जप्त केले आहे. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना शनिवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात केले जणार आहे. या गुन्ह्यांत इतर कोणाचा सहभाग आहे का, या टोळीने आतापर्यंत विदेशातून आलेल्या किती प्रवाशांना क्वारंटाईन न करता पैसे घेऊन होम क्वारटाईनचे शिक्के मारुन दिले याचा पोलिसाकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.