मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात संभाची छत्रपतींच्या नेतृत्वात आज पहिलं मराठी क्रांती मूक आंदोलन झाले. या मराठी क्रांती मूक आंदोलनास सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
मराठा आरक्षणास वंचितचा पाठिंबा
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात मूक आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनस्थळी छत्रपती शाहू महाराजांना वंदन करत मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. मी आधीही सांगतोय आणि आताही सांगतोय आमचा मराठा आंदोलनाला पाठिंबा असणार आहे, असं यावेळी ते म्हणाले. तसेच सरकार कमी पडलं म्हणून ही परिस्थिती उद्भवली. आता ज्याने आरक्षण मिळेल असा चांगला मार्ग सरकारने निवडावा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आरक्षणाबाबत जुन्या-नवीन सरकारने ज्या दक्षता घ्यायला हवी होती ती घेतली गेलेली नाही, असंही ते म्हणाले.
नेता म्हणून नाही कोल्हापूरकर म्हणून आंदोलन
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठा मोर्चात सहभागी झाले. मी मोर्चात नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे. मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल. येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्या, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
राजकारण नको आरक्षण द्या – मुश्रिफ
सर्वात आधी मराठा आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आघाडी सरकारने दिले. त्यावेळी नारायण राणे समिती नेमून मराठा आरक्षण देण्यात आलं. पण त्यावेळी आमच्याकडून जी चूक झाली, तीच चूक भाजप सरकारकडूनही झाली. आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिलं ही आमची चूक होती, त्यामुळेच उच्च न्यायालयाने आरक्षण नाकारलं, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. भाजपला हात जोडून विनंती, राजकारण करू नका, मराठा आरक्षण टिकलं नाही म्हणता, पण कायदा नीट केला असता तर टिकला असता, त्यामुळे आता एकमेकांच्या चुकांकडे लक्ष न वेधता, मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करू, असे आवाहनही त्यांनी केलं.
सतेज पाटलांनी केलं सरकारशी चर्चेचं आवाहन
“संभाजीराजे यांनी मांडलेल्या मागण्यांसाठी राज्य सरकार १०० टक्के सकारात्मक आहे हे मला सांगायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या सर्वांना आपल्याशी चर्चा करुन मार्ग कसा काढता येईल यासंबंधी चर्चा करायची आहे. सरकारला एक पाऊल पुढे टाकून सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य शासन स्तरावरील विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठी तयार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण आपली भेट घेतील. राज्य सरकार सकारात्मक असून तुमच्या भूमिकेला अनुसरुनच सरकारची भूमिका आहे, त्यामुळे आपण उद्याची वेळ देऊन मुंबईला यावं,”अशी विनंती सतेज पाटील यांनी संभाजीराजेंना मनोगत व्यक्त करताना केली होती.