मुक्तपीठ टीम
लोकप्रिय इन्टंट मॅसेजिंग अॅप म्हणून ओळखला जाणाऱ्या व्हॉट्सअॅपने ४ जानेवारीला आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी जाहीर करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. तसेच ८ फेब्रुवारीपासून या सेवा अटी लागू न केल्यास युजर्सचे अकाऊंट बंद केले जाईल असे ही व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे सर्वच युजर्समध्ये असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले होते. त्यावर व्हॉट्सअॅपकडून खुलासाही करण्यात आला. पण, होत असलेली टीका आणि संशयाचे वातावरण कायम असल्याने आणि दुसऱ्या अॅपकडे लोक वळू लागल्याने व्हॉट्सअॅपने प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.
फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने, “नव्या अटींची समीक्षा करून त्या स्वीकारण्यासाठी ८ तारीख देण्यात आली होती, ती आम्ही मागे घेत आहोत. ८ फेब्रुवारीला कोणाचेही अकाऊंट बंद किंवा डिलीट होणार नाही. व्हॉट्सअॅप गोपनियता आणि सुरक्षेवर कशापद्धतीने काम करते याविषयी स्पष्टता आणणार आहोत. १५ मे रोजी व्यावसायिक पर्याय उपलब्ध करण्यापूर्वी नव्या प्रायव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी हळूहळू लोकांपर्यंत पोहोचणार आहोत,”असे ट्विट करून म्हटले आहे.
तसेच “व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना अटींची समीक्षा करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी भरपूर वेळ मिळावा याकडे आम्ही लक्ष देत आहोत. या अटींच्या आधारावर अकाऊंट डिलीट करण्याची वा बंद करण्याची आमची कोणतीही योजना नव्हती आणि भविष्यातही नसेल. त्यामुळे व्हॉट्सअॅप यूजर्संनी निश्चिंत राहावे, असेही पुढे व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे.