मुक्तपीठ टीम
स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. या शिकवणीस अनुसरून ग्रामपातळीवर सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल असा विश्वास पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत तालुका स्तरावरील गट समन्वयक व समूह समन्वयक यांचेकरिता गावपातळीवरील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आराखडा – क्षमता बांधणी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
टोल फ्री क्रमांक व नियंत्रण कक्ष स्थापन करावा
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा- २ अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात राज्याने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून यामध्ये राज्यात घ्यावयाच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांबरोबरच राज्यातील २२ हजार १७३ गावांचा कृती आराखड्यात समावेश असून त्या गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. ही कामे करीत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात टोल फ्री क्रमांक व नियंत्रण कक्षाची स्थापना करावी. प्लास्टिक व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन या घटकांवरही काम करावे अशा सूचना मंत्री पाटील यांनी केल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष,पंचायत समिती सभापती व सरपंच या लोकप्रतिनिधींनी सुद्धा या कामात आपला सक्रिय सहभाग दिल्यास महाराष्ट्रात स्वच्छ – सुंदर गावे निर्माण होतील असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी युनिसेफचे वॉश ऑफिसर युसुफ कबीर यांनी यावेळी प्रकल्प व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या.
अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे म्हणाले, गावांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावेत. गाव फेरी, शिवार फेरी काढून गावातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या समस्या आराखड्यात येतील यादृष्टीने गट समन्वयक व समूह समन्वयक यांनी काम करावे.
सहसचिव अभय महाजन म्हणाले, गटसमन्वयक,समूह समन्वयक यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन गटचर्चा तसेच विविध समित्यांच्या सदस्यांबरोबर चर्चा करून आदर्श आराखडे तयार होतील असे नियोजन करावे.
या उद्घाटन कार्यक्रमाला कृषिमंत्री दादाजी भुसे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार लताताई सोनवणे, आमदार कैलास पाटील, आमदार रमेश बोरनारे, आमदार संतोष बांगर, आमदार अनिल पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सहसचिव अभय महाजन यांच्यासह राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील अधिकारी व कर्मचारी दूर दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा कळविल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगड जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा – २ या कार्यक्रमांतर्गत राज्यातील २२ हजार १७३ गावांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांसह कंपोस्ट खड्डे, गांडूळ खत निर्मिती, बायोगॅस प्रकल्प , मैला व्यवस्थापन, गावागावांतून कचराकुंड्याद्वारे व घराघरांतून गोळा होणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण, प्लास्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन, पुर्नवापर, पुर्नवर्गीकरण यासह सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत व्यक्तिगत / सार्वजनिक शोषखड्डा / परसबाग सार्वजनिक पाझरखड्डे, सांडपाणी शुध्दीकरण करण्याची प्रक्रिया व पुर्नवापर, कमी खर्चाचे जल निस्सारण अनुषंगिक नाली व छोटया पाईपची वहन व्यवस्था आदि उपक्रम राबविण्यात येत आहेत. गाव पातळीवरील स्वच्छाग्रही, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य व ग्रामसेवक यांच्या मदतीने गावांचा घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे.