बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचं अभिनंदन करत संबोधित केलं. पंतप्रधान म्हणाले की,”काही वेळात देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. यासाठी मी देशवासीयांचं अभिनंदन करतो. ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सगळ्यात आधी कोरोना लस मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मोदी म्हणाले,”भारतातील लसीकरण अभियान मानवीय आणि महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. आपले डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना सगळ्यात आधी लस दिली जाईल. या सगळ्यांचा कोरोना लसीवर पहिला हक्क आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि कायदा सुव्यस्थेची जबाबदीर असणाऱ्या लोकांना लस दिली जाईल”.
“इतिहासात इतक्या व्यापक स्वरूपातील लसीकरण यापूर्वी कधीही झाले नाही. जगात १०० पेक्षा अधिक देश असे आहेत की, ज्यांची लोकसंख्या ३ कोटींपेक्षा कमी आहे. तर दुसरीकडे भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. मी सगळ्यांना आठवण करून देतो की, कोरोना लसीचे दोन डोस घेणे अत्यावश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचं अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आपल्या शरीरात करोना प्रतिबंधात्मक शक्ती निर्माण होईल,” असं मोदी म्हणाले.
तसेच दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाईल
यात ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना लस दिली जाईल. तुम्ही कल्पना करू शकता की, ३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले फक्त तीनच देश आहे. चीन, अमेरिका आणि भारत,” असे पुढे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनानंतर देशभरात लसीकरणास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही घटना ऐतिहासिक असून आता संपूर्ण देश कोरोना मुक्तीकडे वळला असल्याचे बोलले जात आहे.