अनंत सोनवणे
भारतातल्या सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांपैकी एक म्हणजे चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प. माझ्यासारख्या वन्यजीवप्रेमींसाठी तर ताडोबा म्हणजे जणू पंढरपूरच! वर्षाआड आमची वारी ठरलेली. १७२७ चौ. कि.मी. पसरलेल्या या पानगळीच्या जंगलात वाघासह प्राण्यांच्या ६२, पक्ष्यांच्या २५०, फुलपाखरांच्या १७४, तर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ३४ जाती आढळतात. ताडोबाचं हे समृद्ध वन्यजीवन म्हणजे वनविभागाने दशकानुदशकं घेतलेल्या कठोर परिश्रमांचं फळ आहेच, मात्र या यशात फार मोठा वाटा आहे, तो तिथल्या ग्रामस्थांच्या सहभागाचा. ताडोबात राहून तिथल्या वनव्यवस्थापनाचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की तिथलं संवर्धनाचं मॉडेल प्रामुख्याने लोकसहभागावर आधारित आहे.
भारतातल्या इतर कोणत्याही जंगलासारख्याच समस्या ताडोबालाही भेडसावत होत्या – अवैध जंगलतोड, शिकार, गुरचराई, वनविभागाशी स्थानिकांचं असहकार्य वगैरे. कायद्याचा बडगा उगारणं, नियमांची कठोर अंमलबजावणी हे झाले नेहमीचे उपाय. पण ताडोबा प्रशासनाने वेगळा मार्ग निवडला. ज्यांच्याकडून जंगलाची हानी होतेय त्यांनाच संवर्धनाच्या कामात सहभागी करून घेण्याचा. तत्कालिन वनसचिव प्रविण परदेशी, क्षेत्र संचालक गणपती गरड, एन. आर. प्रविण ते विद्यमान क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, बफरचे उपसंचालक गुरुप्रसाद यांच्यापर्यंत वनअधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून हे मॉडेल उभं राहिलं.
ताडोबा परिसरात उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे पर्यटन. पर्यटन वाढलं तर स्थानिकांचं उत्पन्न वाढणार. व्याघ्र प्रकल्पाच्या ६२५ चौ. कि.मी. कोअर क्षेत्रात सफारीव्यतिरिक्त इतर कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही. परंतु ११०२ चौ. कि.मी. बफर क्षेत्रात ती संधी होती. कोअर क्षेत्रात पर्यटक सफारीचे सहा गेट होते. बफर क्षेत्रात २०१२ पासून आजतागयत १४ गेट सुरु केले गेले. जुनोना व पळसगाव या गेटवरून नाईट सफारीसुद्धा सुरू झाली. बफर क्षेत्रात ७९ गावं आहेत. वनविभागाने या गावांमधल्याच तरुणांना प्रशिक्षित गाईड बनवलं. कुणी जिप्सीचे मालक, तर कुणी चालक बनले. कुणी गेट व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागले. काही लोकांनी पर्यटकांसाठी होम स्टे सुरु केला, तर काहीजणांना रिसॉर्टस् आणि हॉटेलांमध्ये रोजगार मिळाला. सफारी व्यतिरिक्त बफर क्षेत्रात पक्षी निरिक्षण, पायी निसर्ग भ्रमंती, कयाकिंग, सायकलिंग, बोटींग, ऑडव्हेंचर स्पोर्टस्, कॅम्पिंग साईटस् इत्यादी उपक्रमही सुरु करण्यात आले. विशेष म्हणजे हे सारे उपक्रम ग्रामस्थच चालवतात.
पर्यटनाबरोबरच आगरझरी, अडेगाव आणि देवाडा गावांमधल्या महिलांना अगरबत्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि आवश्यक यंत्रं खरेदी करून अगरबत्ती निर्मितीचे कारखाने सुरु करण्यात आले. त्यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला. वनविभागाने गॅस सिलेंडर पुरवल्याने महिलांचा चुलीच्या धुराचा त्रासही बंद झाला. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव ओळख शिबिरं, ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिरं इत्यादी उपक्रमही राबवले जातात. भविष्यात सोव्हिनिअर शॉपस्, हस्तकला प्रशिक्षण यातून ग्रामस्थांना रोजगार मिळवून देण्याचा वनविभागाचा मानस आहे.
या प्रयत्नांचा खूप सकारात्मक परिणाम आज पहायला मिळतोय. स्थानिकांचं जंगलावरचं अवलंबित्व खूपच कमी झालंय. कारण त्यांना उत्पन्नाचं पर्यायी साधन मिळालंय. हे जंगल माझं आहे, ते वाचलं तर वाघ आणि अन्य प्राणी वाचतील, ते वाचले तर पर्यटन आणि पर्यायाने माझा रोजगार वाचेल, हे त्यांच्या ध्यानात आलंय. त्यामुळे जंगलातल्या अवैध कारवायांना मोठ्या प्रमाणावर आळा बसला. वणवे आणि वन्यजीव-माणूस संघर्षाच्या घटना कमी झाल्या. २०१२ मध्ये आगरझरी गावात बफर सफारीचा गेट सुरु झाला, तेव्हा तिथं सफारीसाठी केवळ आठ कि.मी. रस्ता होता. तिथल्या गाईडनी श्रमदानातून ३०-३५ कि.मी. रस्ता तयार केला, तर लॉकडाऊन दरम्यान पर्यटन बंद असताना वनविभागानं गाईडना तीन महिने रेशन पुरवलं. अशा प्रसंगांमधून वनविभाग आणि ग्रामस्थांदरम्यान विश्वासाचं नातं निर्माण व्हायला मदत झाली. या सा-याचा एकत्र परिणाम म्हणून गेल्या दहा वर्षांत ताडोबामधल्या वाघांची संख्या ३५ वरून ११५ वर पोचलीय! आज तिथं वाघ आणि ग्रामस्थ गुण्यागोविंदाने एकत्र नांदतायत.
ताडोबाचं हे लोकसहभागातून संवर्धनाचं मॉडेल भारतातल्या अन्य व्याघ्र प्रकल्पांनी आवर्जून अभ्यासावं आणि अनुकरण करावं असं आहे. तसं झालं तर वर वर्णन केलेलं सुखद चित्र सर्वत्र पहायला मिळेल.
(अनंत सोनवणे हे पर्यावरण व वन्यजीव पत्रकार आहेत. संपर्क email sonawane.anant@gmail.com, 9819269999)