मुक्तपीठ टीम
दिवंगत रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांच्या लोक जनशक्ती पक्षात मोठ्या उलथापालथ होताना दिसत आहे. त्यांचा मुलगा चिराग पासवानलाच एकाकी पाडले गेले आहे. पक्षाच्या पाच खासदारांनी बंड केले आहे. बंडखोरांमध्ये दोन पासवान कुटुंबातील आहेत. त्यांनी चिरागचे काका पशुपती कुमार पारस यांची निवड केली आहे. त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षांसह संसदीय पक्षाच्या नेत्याचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पक्ष आणि घरही फुटले!
• ज्या पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे त्यात पासुपती पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर यांचा समावेश आहे.
• बिहार विधानसभा निवडणुकीत एलजेपीने जेव्हा भाजप-जेडीयूपासून वेगळं होऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हापासूनच पक्षातील नेते चिराग यांच्यावर नाराज होते.
• त्या नाराजीमुळे पाचही खासदारांनी उघड बंडखोरी केल्याचं समजतं.
रात्रीच्या अंधारात फुटीवर शिक्कामोर्तब
• रविवारी उशिरापर्यंत चाललेल्या एलजेपीच्या खासदारांच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली.
• पाच खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना त्यांच्या निर्णयाबद्दल माहिती दिली.
• यासंदर्भात खासदारांनी त्यांना अधिकृत पत्रही लिहिले.
• सोमवारी हे खासदार निवडणूक आयोगालाही याबाबत माहिती देतील. त्यानंतर, ते त्यांचे निर्णय अधिकृतपणे जाहीर करतील.
• दुसरीकडे पक्षाचे प्रवक्ते अशरफ अन्सारी यांनी अशी कोणतीही फूट पडलेली नसल्याचे सांगितले आहे.
लोजपा फोडण्यामागे नितीशकुमारच?
• पशुपती कुमार पारस गेल्या काही दिवसांपासून जेडीयूचे खासदार ललन सिंह यांच्याशी सतत संपर्कात होते.
• अलीकडेच दोघांमध्ये पाटण्यात बैठक झाली.
• दिल्लीमध्येही त्यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहेत.
• खासदारही त्यांचा संपर्कात होते.
• चिराग पासवान यांनी एनडीएविरोधात त्यातही जदयूच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवली, त्याचा फटका सर्वात जास्त नितीशकुमारांच्या पक्षालाच बसला. त्यामुळे त्यांना चिरागना धडा शिकवण्याची संधी पाहिजे होती.
पारस यांचीच निवड नेता म्हणून का?
• एलजेपीच्या खासदारांपैकी पारस सर्वात ज्येष्ठ आहेत.
• ते रामविलास पासवानांचे धाकटे बंधू आहेत.
• ते सर्वांना सोबत घेऊ शकतात.
• ते नेते झाल्यामुळे इतर खासदारांनाही खटकणार नाही.
पशुपती पारस यांना मंत्रीपदाची शक्यता
• पशुपती पारस केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात-
• केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा तीव्र होत आहे.
• अशा परिस्थितीत पारस केंद्रात मंत्री होऊ शकतात.
• २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी पुन्हा सत्तेवर आले तेव्हा मित्रपरिषदेमध्ये मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात येईल, असा फॉर्म्युला तयार करण्यात आला.
• त्यानंतर १६ खासदार असलेले जदयू मंत्रिमंडळात सामील झाली नाही.
• त्यांनी किमान दोन जागांची मागणी केली.
• त्याचवेळी ६ खासदार असलेल्या एलजेपीचे रामविलास पासवान मंत्री झाले.
• पण रामविलास पासवान यांचे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर निधन झाले.
• यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील लोजपाचा रिक्त कोटा भरला नाही.