मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणासाठी जनजागरण मोहिमेवर असलेले खासदार संभाजी छत्रपती आज नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावातील त्या लेकीच्या स्मारकाला भेट देणार आहेत. जिच्यावरील अमानुष अत्याचार आणि हत्येनंतर मराठा समाज २०१६मध्ये संतापून रस्त्यावर उतरला, त्या कोपर्डीच्या लेकीच्या स्मारकाला संभाजी छत्रपतींची भेट ही मराठा समाजात थेट संदेश देणारी मानली जात आहे. त्यानंतर ते औरंगाबादेत मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या काकासाहेब शिंदेंच्या स्मारकाला भेट देणार आहेत. दोन्ही भेटींमुळे मराठा समाजात एक भावनात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे.
खासदार संभाजी छत्रपती हे पुण्याहून सकाळी १० वाजता निघणार आहेत. दुपारी २ वाजता ते कोपर्डी,अहमदनगर येथे पोहचतील. तेथे कोपर्डीच्या लेकीच्या स्मारकाला भेट देतील. त्यानंतर औरंगाबादकडे रवाना होतील. सायंकाळी ५ वाजता कै.काकासाहेब शिंदे यांच्या
स्मृती स्थळाला भेट देणार आहेत.
तरी सर्व मराठा समन्वयक, मराठा समाज बांधव यांनी सकाळी कोपर्डी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन कोपर्डीसाठी पहिल्या दिवसापासून लढणारे इंजिनीअर संजीव भोर यांनी केले आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती सेनेचे गणेश कदम यांनीही तसे पत्रक प्रकाशित केले आहे.