मुक्तपीठ टीम
अधिकारी असावेत तर असे… भिवंडी महानगरपालिकेच्या महिला अधिकारी सुविधा चव्हाण यांचे कार्य पाहूनच अतिशय कौतुक होत आहे. मंगळवारी पावसाच्या आधी सुविधा चव्हाण यांनी शहरातील मॉन्सूनपूर्व सफाईची पाहणी केली. पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या भूमिगित गटारांची स्वच्छता कशी झाली आहे, ते तपासण्यासाठी त्यांनी काही मॅनहोलही तपासले. तपासणीदरम्यान त्यांना स्वच्छतेचा संशय आला तेव्हा पायऱ्यांच्या साहाय्याने त्या थेट भूमिगात गटारांमध्ये उतरल्या. काही ठिकाणी त्यांना अपेक्षेप्रमाणे स्वच्छता मिळाली, परंतु, काही ठिकाणी असलेली घाण पाहून त्यांनी त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला.
पावसाळा आल्यानं गटार साफसफाईचे काम जोरात सुरू आहे. ठेकेदारांना सफाईचे काम सोपविण्यात आले होते. या कामात कोणतीही चूक होणार नाही, यासाठी महिला निरीक्षक सुविधा चव्हाण फिरत असून मॅनहोलची तपासणी करत आहेत. याच भागात मंगळवारी त्या तपासणीसाठी निजामपूर भागात पोहोचली होत्या. त्यांचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये त्या तपासणीसाठी मॅनहोलमध्ये उतरताना दिसत आहे.
विशेष गोष्ट अशी आहे की, महिला अधिकारी यांनी साडी नेसली होती. आणि त्या मॅनहोलमध्ये उतरल्या. कपड्यांकडे दुर्लक्ष करून त्यांनी ज्या प्रकारे अत्यंत प्रामाणिकपणे तपासणीचे काम केले. आता सोशल मीडियामध्ये त्याचे कौतुक होत आहे. मॅनहोलच्या तपासणी दरम्यान त्या सफाईचे काम करणाऱ्या मजुरांशीही बोलल्या आणि त्यांना योग्य ते करण्याचे निर्देश दिले.
महिला अधिकारी सुविधा चव्हाण म्हणाल्या की, “असे करण्यास मला कोणतीही भीती वाटत नाही. हा केवळ कामाचा एक भाग आहे. गटारांची योग्यप्रकारे साफसफाई न केल्यास रस्त्यावर साचलेले पाणी पावसाळ्यात आणखी पुढे जाऊ शकणार नाही आणि लोकांना अडचणींना सामोरे जावे लागेल. मी बरेच काही ऐकले होते की गटार वारंवार स्वच्छतेच्या अभावामुळे पाण्याने भरतात. त्यामुळे आता शहरातील प्रत्येक गटार स्वच्छ आहे याची काळजी घेणे आवश्यक आहे.”