उदयराज वडामकर
कोरोना संकटात जवळची नातीही संसर्गाच्या भीतीने दुरावत आहेत, तर दुसरीकडे कोल्हापूरची एक रणरागिणी मात्र भीती न बाळगता कोरोनाबाधितांच्या मृतदेहांना शववाहिकेतून स्मशानात पोहचवत आहे. त्यांचे अंत्यसंस्कार सन्मानानं व्हावेत, यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये चितेला अग्नी देईपर्यंत सहभागी होत आहे.
कोल्हापूरची ही रणरागिणी आहे प्रिया पाटील. कोल्हापूरातील पुरोगामी मातीतील एका चळवळ्या कुटुंबातील लेक. बीएससीची विद्यार्थीनी. योगशिक्षिका. तिचे वडिल कामगार नेते प्रकाश नेताजी पाटील, आई मनिषा पाटील यांच्याकडून ती समाजाचे देणे फेडणे हे कर्तव्य असल्याचे शिकली. तीन महिन्यांपूर्वी कोरोना संकट पुन्हा ओढवले. कोल्हापुरात तर दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. रोजच मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न उभा राहू लागला. त्यावेळी जे पुढे सरसावले त्यांच्यातील एक म्हणजे प्रिया पाटील.
कोल्हापुरात कोरोना मृत्यू वाढले. मनपाची सोय कमी पडू लागली. तेव्हा हर्षल सुर्वेंचे भवानी फाऊंडेशन आणि बालाजी कलेक्शन यांनी शववाहिका सेवा सुरु केली. तेव्हा त्यांना ती चालवण्यासाठी चालक पाहिजे होता. तेव्हा प्रिया पुढे सरसावली. एखादी महिला घरावर संकट आलं की कंबरेला पदर खोचून जशी सामोरे जाते तशीच प्रिया पाटील अंगावर पीपीई किट चढवून कामाला लागली. ती शववाहिका चालवू लागली. पण केवळ तेवढ्यापुरतीच तिची भूमिका नसते. ती मृतदेह शववाहिनीत व्यवस्थित ठेवून घेतला की स्मशानाकडे निघते. तेथे पोहचल्यावर चिता रचून अंत्यसंस्कारापर्यंत तिथं थांबते. गेल्या तीन दिवसात तिने २८ कोरोना मृतदेहांना सन्मानाने अखेरचा निरोप दिला आहे.
प्रियाच्या घरची परंपरा सेवाभावाची
• प्रिया पाटील बी.एस.सी. पहिल्या वर्षाची विद्यार्थीनी आहे.
• तिचे वडिल प्रकाश नेताजी पाटील हे कामगार नेते आहेत. मनिषा प्रकाश पाटील या एलआयसी एजेंट आहेत.
• ते समाजसेवेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत.
• कोरोना संकटात कामगार, मित्र यांच्यापैकी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावत असतात.
• त्यांच्याकडून प्रियावर सेवाभावाचे संस्कार झाले, त्यातूनच ती कोरोनाविरोधी युद्धात सहभागासाठी पुढे सरसावली.
कोल्हापूरची रणरागिणी…कोरोनाविरोधी युद्धात पुढे सरसावली
• हर्षल सुर्वेंचे भवानी फाऊंडेशन आणि बालाजी कलेक्शन यांनी शववाहिका तयार केली.
• मनपा मुख्यालयात प्रिया आणि तिच्या वडिलांनी शववाहिका चालवण्यासाठी स्वत: तयारी दर्शवली.
• हर्षल सुर्वेंनी प्रियावर जबाबदारी सोपवली.
• गेल्या तीन दिवसांपासून प्रियाने आतापर्यंत २८ मृतदेहांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पडली.
• प्रिया पाटील योगशिक्षिकाही आहे. ती भविष्यात योगक्षेत्रातच करिअर करणार आहे.
• त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातील सहभागही तिला सुरुच ठेवायचा आहे.
आपल्याला संसर्ग होईल याची भीती तिला वाटत नसावी, असं नाही, पण कोरोना बाधितांना योग्य उपचार मिळाले, पाहिजेत, यासाठी प्रिया पाटील त्यांना मदत करते. त्यांना रुग्णालयात पोहचवते.
टीम मुक्तपीठचा प्रिया पाटीलच्या कार्याला मानाचा मुजरा!