मुक्तपीठ टीम
रा. स्व. संघाचे ‘मोतीबाग’ हे पुण्यातील कार्यालय माझ्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे संघाच्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करायला मिळतो. संघटनेपेक्षा कुठल्याही आपल्या व्यक्तीला एका मर्यादित लोकप्रियतेपेक्षा संघ मोठे होवू देत नाही. तसेच, ‘गरज सरो वैद्य मरो’ या तत्वानुसार प्रभुत्व गमवणाऱ्या व्यक्तीला संघ अलगदपणे बाजूला सारतो असा टोमणा काँग्रेसचे माजी आमदार व प्रवक्ते अनंत गाडगीळ यानी लगावला आहे.
कोरोनाची पहिली लाट थोपवून धरल्याची केंद्रीय नेतृत्वाने केलेली भ्रामक कल्पना, स्तुतिसुमनांच्या घंटानादामुळे तज्ञांच्या ईशाऱ्याकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य, कुंभमेळा व पाच राज्यांच्या निवडणूक आयोजनातून दाखविलेली अपरिपक्वता, त्यानंतर कृतीतील बेसावधपणा यामुळे दूसरी लाट हाताबाहेर गेली.
पाठोपाठ, लसीकरण धोरणात उडालेला गोंधळ, लसीकरण प्रक्रियेचे फसलेले नियोजन, परदेशी औषध कंपन्यांना सुरवातीस नाकारत केवळ दोनच भारतीय कंपन्यांवर अवलंबून राहिल्याने प्रचंड मंदावलेल्या लसीकरणाचा वेग की ज्यामुळे अजुन वीस टक्के सुद्धा भारतीयांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही, त्यातच, १०-१२ वी च्या परीक्षा निर्णय बैठकीस शिक्षणमंत्र्याऐवजी संरक्षणमंत्र्यांना पाठविण्याचा विनोद, यावरून केंद्रात कश्याचाच ताळमेळ राहिला नसल्याचे आता स्पष्ट झाल्याची टीका गाडगीळ यांनी केली आहे.
भरीतभर खुद्द उत्तर प्रदेशातील शेकडो मृतदेहांच्या सामुदायीक दहनाचे परदेशी वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेले फोटो, गंगेतून वाहणाऱ्या मृतदेहांचे व्हायरल व्हिडीओ, यामुळे मोदींजीच्या प्रतिमेस तडा गेला. संघाला अखेरीस दिल्लीत चिंतन बैठक बोलवावी लागली. दुसरीकडे अचानकपणे नितिन गडकरी यांच्या विविध भाषणांचे व कार्याचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागणे ह्याला बराच अर्थ आहे.
मोदीजींची लोकप्रियता अधिक घसरल्यास, ९० च्या दशकात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अडवाणींना जसे संघाने कालांतराने बाजूला केले तसेच काही महिन्यात मोदींनाही बाजूला करेल, असा राजकीय अंदाज गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे.