मुक्तपीठ टीम
सुमारे ५२ लाख रुपयांचा ३४५ किलो गांजाचा साठा जप्त करुन एका मुख्य आरोपीला साकिनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अशोक माणिक मेत्रे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी अंधेरीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळंवत देशमुख यांनी सांगितले. प्राथमिक तपासात हा गांजा आंध्रप्रदेशातून आणण्यात आला होता, त्याची टप्याटप्याने विक्री करण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला गेला आहे, या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.
इतर राज्यातून मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याने अशा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश वरिष्ठांनी सर्वच पोलीस ठाण्यांना दिले होते, या आदेशानंतर पोलिसांनी आपल्या परिसरात अशा प्रकारे तस्करी करणार्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती, ही मोहीम सुरु असतानाच साकिनाका येथील संघर्षनगर परिसरात लाखो रुपयांच्या गांजाची साठवणूक करुन नंतर या गांजाची विक्री होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहम पाडवी यांना मिळाली होती, ही माहिती त्यांनी वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते, त्यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त नागरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बुधन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील, सोहम पाडवी, मच्छिंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक भारत वाघे, ढवण, दगडे, पोलीस हवालदार पाटील, भुवड, पवार, सरतापे, सुशील कदम, तडवी आणि एटीएस पथकाने साकिनाका येथील चांदीवली, संघर्षनगर, इमारत क्रमांक १०/एचमध्ये छापा टाकला होता, या कारवाईत पोलिसांनी तेथून ३४५ किलो ५२५ किलो गांजाचा साठा जप्त केला. या गांजाची किंमत ५१ लाख ८२ हजार ८७५ इतकी आहे.
या कारवाईनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरु केला होता, ही शोधमोहीम सुरु असताना काही तासांत पोलिसांनी अशोक माणिक मेत्रे या ३९ वर्षांच्या आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेतले, चौकशीत त्यानेच हा साठा आंध्रप्रदेशातून आणल्याची कबुली दिली. हा साठा फ्लॅटमध्ये ठेवल्यानंतर तो टप्याटप्याने या गांजाची विक्री करणार होता, याकामी त्याला इतर काही सहकार्यांनी मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष शोधमोहीम सुरु केली आहे. अशोकविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करुन त्याची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून केली जाणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करणार्या पोलीस पथकाचे विशेष सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहम पाडवी यांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.