मुक्तपीठ टीम
कौन बनेगा करोडपती (केबीसी) मध्ये एका विवाहित महिलेच्या बहिणीने ५० लाखांची रक्कम जिंकली. तेव्हा त्या महिलेच्या पतीने ५० लाख रुपये हुंडा आणण्यासाठी दबाव टाकला. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही महिला ३६ वर्षीय आहे. दिल्लीच्या ऐशबाग परिसरातील आहे. मार्च २०१६ मध्ये तिचे लग्न निशातपुरा येथे राहणाऱ्या सय्यद नासिर हुसेनशी झाले होते. त्या दोघांना चार वर्षाचा मुलगा आहे. कौन बनेगा करोडपती? (केबीसी) कार्यक्रमात महिलेच्या बहिणीने ५० लाख रुपये जिंकले. महिलेचा पती सय्यद नासिर हुसेन, सासू रफत हुसेन, सासरे शाहिद हुसेन यांनी तिच्या बहिणीकडून ही सगळी रक्कम आणण्यासाठी दबाव टाकण्यास सुरूवात केली.
जेव्हा मागणी पूर्ण झाली नाही तेव्हा महिलेवर अत्याचार करण्यात आले. पीडित महिलेने महिला पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
जिंकलेल्या पैशातून गावात शाळा सुरू करण्याचे स्वप्न
एकीकडे केबीसीमध्ये बहिणीने जिंकलेल्या ५० लाखांमुळे एका विविहित महिलेच्या जीवन उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे जिंकलेल्या ५० लाखांमुळे मध्यप्रदेशातील एका महिलेच्या जीवनात आलेल्या बाधा दूर होऊन स्वप्न साकारण्याची संधी मिळाली आहे.
कौन बनेगा करोडपती -१२ मध्ये ग्वाल्हेरच्या ५८ वर्षीय किरण बाजपेयीने ५० लाख रुपये जिंकले. किरण व्यवसायाने ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र सल्लागार आहे. या कार्यक्रामाचे प्रस्तुतकर्ता, हिंदी चित्रपटातील दिग्गज अमिताभ बच्चन, यांना ती भाऊ मानते. इतकेच नाही तर रक्षाबंधनला दरवर्षी अमिताभ बच्चन यांना राखी पाठवते. त्याला उत्तर म्हणून अमिताभ त्यांना पत्रही पाठवतात.
किरणला कर्करोग झाला आहे. उपचारासाठी तिला आपली आवडती कार विकावी लागली होती. ती आयुष्यात तिच्या स्वप्नांना फार महत्त्व देते. शोमध्ये किरणने तिच्या चार लाइफलाईनचा वापर करून ५० लाखांचे बक्षीस जिंकले. त्यानंतर, एक कोटी रुपयांच्या १५ व्या प्रश्नावर संशय आल्याने तीने हा खेळ तिथेच सोडला. पण, नंतर तिने एक कोटीच्या प्रश्नाला दिलेले उत्तरही बरोबर होते.
या शोमध्ये जिंकलेल्या पैशातून तिला तिची आवडती कार परत खरेदी करायची आहे, जी तिने तिच्या कर्करोगाच्या उपचारासाठी विकली होती. याशिवाय तिला ग्वाल्हेरच्या टांकोली आणि जरगा या गावात शाळा सुरू करायाची आहे. किरणच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नेहमीच तिच्या पतीने साथ दिली आहे.