मुक्तपीठ टीम
चौदा वर्षांच्या लढ्यानंतर चंद्रपूरमध्ये महिलांनी मिळवलेली दारूबंदी राज्यातील आघाडी सरकारने चौदा महिन्यातच रद्द केली. त्यामुळे तिथल्या स्त्रियांना दुष्परिणाम भोगावे लागतील, अशी भीती आहे. त्याचवेळी शेजारच्या गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात दारू आयात सुरु होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या जनतेला व दारूबंदीला धोका निर्माण झाला असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी म्हटले आहे. त्यांनी जिल्हा दारूमुक्ती संघटनेच्या वतीने एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यात त्यांनी गडचिरोलीतील १०५० गावांनी शासनाला दारूबंदी हवीच अशी निवेदने पाठवले असल्याचे स्पष्ट केले आहे.
डॉ. अभय बंग यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
• गडचिरोली जिल्ह्यात १९९३पासून दारूबंदी आहे.
• गेल्या पाच वर्षांपासून ‘मुक्तीपथ’ अभियान सुरू आहे.
• ‘पेसा’ कायद्याअंतर्गत ग्रामसभांना संवैधानिक अधिकार आहेत.
• यामुळे गावातल्या महिलांनी सामूहिकरीत्या ६०० गावात दारूविक्री बंद केली आहे.
• १०५० गावांनी जिल्ह्यात दारूबंदी हवीच, ती अजून मजबूत करा, अशी निवेदने पाठविली.
• जिल्ह्यात दारू पिण्याचे प्रमाण दारूबंदीपूर्वीच्या तुलनेत ७० टक्के कमी झाले असल्याचे डॉ. बंग यांनी सांगितले.
• जिल्ह्यात ४८ हजार पुरुषांनी दारू पिणे सोडले असल्याचा दावाही त्यांनी केला.