मुक्तपीठ टीम
एकीकडे कोरोना महामारीमुळे सर्वत्र आरोग्यविषयक स्वच्छतेचे भान येत असल्याचे मानले जात असतानाच दुसरीकडे स्वत:ची जबाबदारी टाळत निसर्गाला घाण करणारेही कमी झालेले नाहीत. त्यातही धक्कादायक बाब अशी की कोरोनाकाळात तरी सजगतनेने हाताळावा असा वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीचा विषय आजही ढिसाळपणानेच हाताळला जात असल्याचे दिसत आहे. कारण नवी मुंबईतील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी नुकत्याच राबवलेल्या खारफुटी स्वच्छता मोहिमेच त्यांना कित्येक किलो वैद्यकीय कचरा सापडला आहे. कोणत्याही प्लास्टिक किंवा अन्य कचऱ्यामुळे खारफुटीचा जीव गुदरमला जात असतोच पण या वैद्यकीय कचऱ्यामुळे साथीच्या रोगांची गंभीरता अधिकच उफाळण्याची भीती व्यक्त होते आहे. सुदैवाने एन्व्हायरोमेंट लाइफ स्वयंसेवी संस्थेच्या सतत अविरत प्रयत्नांमुळे तो धोका तिथं तरी टळला आहे.
नवी मुंबईतील पर्यावरण प्रेमी पहिल्या लॉकडाऊनपासूनच स्वच्छतेसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे नेरळ परिसरातील काही ठिकाणच्या खारफुटींना आता मोकळा श्वास घेता येत आहे. एन्व्हायरोमेंट लाइफ स्वयंसेवी संस्था नवी मुंबई मनपाच्या सहकार्याने दर रविवारी खारफुटी स्वच्छता मोहिम राबवत असते. या रविवारीही संस्थेच्या स्वयंसेवकांनी श्रमदान केले. खारफुटीमध्ये वाहून आलेला, काही बेजबाबदार अपप्रवृत्तींनी फेकलेला कचरा शोधला. सर्वांनी मिळून तो कचरा खारफुटीतून जमा केला.
स्वच्छता मोहिमेचा हा ४२वा आठवडा आहे. दर रविवारी खारफुटीत स्वच्छता मोहीम राबवली जाते. आतापर्यंत राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत ३० टन कचरा काढला गेला आहे. या रविवारी स्वयंसेवकांना खारफुटीत सिरपच्या बाटल्या, डोळ्याचे थेंब, औषधी पॅकेट्स, टेस्टिंग किट, सिरिंज, एक्सपायरी ड्रग्ज असा वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणावर सापडला आहे. त्यातील काही भाग हा आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. जिथे माशांचे प्रजोत्पादन होते त्या खारफुटीत असा आरोग्यविघातक कचरा असणे खूप हानीकारक आहे. त्याशिवाय कॉस्मेटिक कचरा, चॉकलेट आणि वेफर्सचे आवरण, दारूच्या बाटल्या, पॅकेज केलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचे पादत्राणे, कप, एकल वापरलेले प्लास्टिक, चमचे, सिगरेटचे पाकिटे, दुधाचे पाकिटे, सर्फ पॅकेट्स, फूड पॅकेट्स, बल्ब, थर्माकोल, ट्यूब लाइट्स, कंटेनर इत्यादी वस्तूही सापडल्या आहेत. हा कचराही दहा टन तरी असावा.
दर रविवारी ही संस्था स्वच्छता मोहीम राबवते. या मोहिमेत आजवर शेकडो टन कचरा जमा केला गेला आहे. संस्थेचे धर्मेश बरई यांनी या मोहिमच्या आयोजनासाठी खास मेहनत घेणाऱ्या सर्व स्वयंसेवक आणि मनपा अधिकाऱ्यांना श्रेय दिले आहे. सॅनिटरी इंस्पेक्टर विजय नाईक हे दर रविवारी स्वयंसेवकांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी होतात.
नवी मुंबई मनपाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, बेलापूरचे विभाग अधिकारी तांडेल, राजेंद्र सोनवणे, विजय नाईक, एन्व्हायरोमेंट लाइफचे रोहन भोसले, श्रीराम शंकर, मनोज अरोरा, राहुल रासकर, रुद्रा सिंह, पियुश यादव हे सहभागी झाले होते.
ही मोहीम कशी सुरु झाली त्याची माहिती धर्मेश बरई यांच्याच शब्दात:
मी गेल्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टी.एस. चाणक्य इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटी नेरुळ, नवी मुंबईच्या मागे खारफुटी नर्सरी, कराव जेट्टीला गेलो होतो. तेव्हा मला सुंदर दाट खारफुटीचे क्षेत्र दिसले. पण पुढे पाहिले तर बर्याच ठिकाणी कचरा (बहुतेक प्लास्टिक) तरंगत होता. खारफुटीला कचऱ्याचा विळखा हे चित्र निराशाजनक होते. म्हणूनच आमच्या टीमने सागरी जीवनातील नाजूक परिसंस्था वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. खारफुटीतील कचरा दूर करण्यासाठी योजना आखली.
मग एक दिवस मी रोहन भोसले आणि श्रीराम शंकर या दोन मित्रांसह क्लीनअप योजना राबवायचे ठरविले. त्या दोघांनी मला पाठिंबा दिला. शेवटी आम्ही १५ ऑगस्ट २०२० रोजी क्लीन-अप मोहिमेचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे स्वातंत्र्यदिन. आम्ही स्वयंसेवक होतो, ज्यांनी सुरुवातीला #MangrovesCleanupDrive मोहीम सुरु केली. त्यावेळी आम्हाला किनाऱ्यावरील धोक्याची कल्पनाही नव्हती. कचर्याचे काय करावे, कमी स्वयंसेवकांच्या बळावर कसे काम करावे, साथीचा रोग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, यावर चर्चा केली.
मोहिमेनंतर आम्ही जनजागृती करण्यासाठी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्या ड्राइव्हबद्दलचे सर्व फोटो आणि व्हिडिओ ठेवण्याचा निर्णय घेतला आणि नवी मुंबईतील नागरिकांना दर रविवारी सकाळी ८ ते १० या दरम्यान श्रमदान म्हणून आमच्या ड्राईव्हमध्ये सामील व्हावे असे आवाहन केले. दर आठवड्याला नवीन स्वयंसेवकांच्या समावेशाने हळू हळू मोहिमेला वेग आला.
तिसर्या आठवड्यानंतर @EnvironmentLife च्या ट्विटर पेजला @nmmccmr (नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त) आणि स्वच्छ भारत मिशन लीड डॉ बाबासाहेब राजळे यांच्या ट्विटर हँडलवरून एक मॅसेज आला. त्यांनी माझा संपर्क तपशील विचारला आणि दुसर्याच दिवशी सरांचा फोन आला. ते आपुलकीने बोलले. मला भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्याच्या कार्यालयात बोलावले.
डॉ. राजळे यांनी कचरा वाहून नेण्यासाठी हातमोजे, उपकरणे आणि ट्रक यासारख्या मोहिमेला सर्वतोपरी सहकार्य केले. तसेच स्वयंसेवक म्हणून ड्राइव्हमध्ये सामील होण्यासही सुरुवात केली. स्वच्छ भारत मिशन एनएमएमसीचे प्रमुख राजेंद्र सोनवणे, बेलापूर वॉर्डचे शशिकांत तांडेल प्रभाग अधिकारी, बेलापूर वॉर्डचे विजय नाईक एसआय आणि नियमितपणे आमच्याबरोबर काम करणारी टीम असे सर्व एकत्र आल्याने मोहीम गतिमान झाली.
एन्व्हायरोमेंट लाइफ स्वयंसेवी संस्थेचे उपक्रम
• वृक्षारोपण व संरक्षण
• सिटी क्लीन-अप ड्राइव्ह
• मुंबईचा रेल्वे ट्रॅक स्वच्छ करण्यासाठी ट्विटर मोहीम
• स्वस्त जाहिरातींना ‘नाही’ म्हणा
• प्लास्टिकला ‘नाही’ म्हणा
• कमळ तलाव जतन करा
• क्लीन ओवे धरण
• धबधबा क्लीन-अप ड्राइव्ह
पाहा व्हिडीओ: