मुक्तपीठ टीम
ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेश जेठमलानी हे दिवंगत विधिज्ञ राम जेठमलानी यांचे पुत्र आहे. दिवंगत खासदार रघुनाथ महापात्रा यांच्या रिक्त जागेवर जेठमलानी यांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले आहे.
महेश जेठमलानी हे भाजपाचे नेते आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेल्या लेटर बॉम्ब प्रकरणात ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे वकील आहेत. राज्यसभा खासदार म्हणून जेठमलानी यांचा कार्यकाळ मे २०२४ पर्यंत चालेल.
राज्यसभेच्या नामनिर्देशित प्रवर्गात दोन जागा रिकाम्या होत्या. स्वपन दासगुप्ता यांनी यावर्षी मार्च महिन्यात राज्यसभेचा राजीनामा दिला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती. तर कोरोनामुळे या महिन्यात रघुनाथ महापात्रा यांचे निधन झाले तेव्हा दुसरी जागा रिक्त झाली. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यसभेत १२ सदस्यांची नेमणूक करू शकतात. त्यानुसार महापात्रा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर जेठमलानी यांची नियुक्ती झाली आहे.
कोण आहेत महेश जेठमलानी?
• महेश जेठमलानी यांची देशातील मोठ्या, नामांकित वकिलांमध्ये गणना केली जाते.
• दिवंगत ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांचे ते सुपुत्र आहेत.
• मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी २००९ मध्ये प्रिया दत्तविरोधात लोकसभा निवडणूकही लढवली होती, परंतु ती निवडणूक ते हरले होते.
• त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या मोठ्या प्रकरणांमध्ये वकिली केली आहे.