मुक्तपीठ टीम
पत्नी मुमताजबेगमसाठी ताजमहाल बांधणारा शहांजहां अमर झाला. तो बादशाह होता, पण मध्यप्रदेशातील एका गरीब मजुराने बजावलेली कामगिरी त्याच्याएवढीच मोठी आहे. क्षमतेचा विचार केला तर नक्कीच. या एका गरीब मजुराने पत्नीचा पाणी भरण्याचा त्रास कमी करण्यासाठी घराजवळच विहीर खणली आहे. त्याने हे करून दाखवलं तेही फक्त १५ दिवसातच, हे विशेष.
मध्य प्रदेशमधील गुणा गावात घरापासून अर्धा किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या हातपंपावरून एका गरीब मजुराची पत्नी पाणी भरत असे. पत्नीला होणारा त्रास पाहून, त्या गरीब कामगाराने १५ दिवसांत स्वत: च्या घरात एक विहीर खोदली. जिल्हा प्रशासनाने त्या गरीब कामगाराचे पत्नीच्या प्रेमापोटी केलेल्या कृतीबद्दल कौतुक केले आहे. तसेच त्यांच्या जीवनात प्रगती होण्यासाठी काही सरकारी योजनांचे लाभ त्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
चंचोदा तहसील अंतर्गत भानपूर बावा गावात राहणारा भरत सिंह (४६) यांना त्यांच्या पत्नीच्या बाबतीत चिंता होती, कारण तिला कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पाण्यासाठी हातपंपावर जावे लागत होते. एके दिवशी त्या हातपंपामध्ये काही कारणामुळे बिघाड झाल्याने त्यांना पाणी मिळू शकले नाही, त्यानंतर तिने पतीला ही गोष्ट सांगितली.
सिंह यांनी नंतर पत्नीला सांगितले की, घरातच तिच्यासाठी विहीर खोदेल, परंतु पत्नी ऐकून फक्त हसली. त्यानंतर त्याने हे आव्हान म्हणून स्वीकारले आणि दोन महिन्यांपूर्वी १५ दिवसांत ३१ फूट खोल व ६ फूट रुंद विहीर खोदली, असे सिंग म्हणाले.
या विहिरीमुळे त्याच्या कुटुंबाच्या गरजेला पुरेल एवढेच नाही तर त्याच्या छोट्या शेतीसाठीही पुरेल एवढे पाणी मिळते आहे.
पाहा व्हिडीओ :