प्रा. सतीश फाटक /व्हा अभिव्यक्त!
माणूस असंघटित असणे म्हणजे काय? ह्याच जिवंत उदाहरण रासायनिक खतांची मोदी सरकारने केलेली दुप्पट वाढ होय. दुप्पट वाढ आणि त्यानंतर ऐतिहासिक निर्णय घेतल्याचा आव या असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे मोदी सरकार, भांडवलंदारांचा पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी. शेतकरी, शेतमजूर,कामगार, बँकर्स, लहान लहान व्यापारी ह्यांचे शोषण करणारे पंतप्रधान म्हणजे माननीय नरेंद्र मोदी. वाचक मित्रांनो! आमचे संस्कार आम्हाला परवानगी देत नाहीत. संविधानिक पदावर बसलेल्या माझ्या प्राणप्रिय देशाच्या पंतप्रधानला शिव्या देण्याची आमची संस्कृती नाही. नाहीतर अस्सल ठेवणीतल्या कोकणी शिव्या आम्हाला फार छान येतात. मुजोर, हिटलरशाहीचे सरकार म्हणजे हे मोदी सरकार.
शेतकऱ्यांनो ही लोक तुमचा जीव घेतल्याशिवाय, तुम्हाला भांडवलदारांच्या दारात गुलाम म्हणून बांधल्या शिवाय शांत होणार नाहीत. कारण शेतकरी हा कोणत्याच अन्याय विरोधात एकत्र येत नाही. त्याला पक्षीय दोरखंड एवढे मजबूत बांधलेत की सुटता सुटत नाही, त्याउपर सुटलाच तर धर्म आहेच, त्यातुनहीं सुटला तर जात तर कुठे सुटलीच नाही. आता शेतकरी बांधवांनी या सर्व बंधनातून मुक्त होण्याची अत्यंत प्रामाणिक गरज आहे. शेतकरी मित्रांनो! ती गाढवाची कहाणी माहिती असेलच, त्या गाढवाचा मालक दररोज २ विटा टाकून त्याचा भार वाढवायचा,त्यावर गाढव काहीच बोलत नव्हतं. मुकाट अन्याय सहन करत असायचे.एके दिवशी ते गाढव कंबरेतून तुटून पडलं. जागेवरच मेले.हीच परिस्थिती तुमच्यावर आमच्यावर येणार असे वाटते. १००% येणार आहे,कारण त्या गाढवात व आपल्यात काहीच फरक माननीय मोदींना दिसत नाही.
आपण रस्त्यावर उतरणार नाही. रस्त्यावर कोण उतरत असेल तर त्याचा पक्ष, धर्म, जात बघणार. तुम्हाला सांगतोय..! भाजप काय कोणत्याच पक्षात आणि कोणत्याच नेत्यात हिम्मत नाही तो तुमच्या आमच्यासाठी लढेल. भाजपचे आमदार-खासदार तर गुलामीत आहेत. त्यांना बोलण्याची मुभा नाही. ते फक्त बहुजन म्हणून त्यांना पोझिशन दिली, पॉवर नाही. विषय खूप मोठा आहे. डोकं शांत होत नाही. हा अन्याय बघून जीवाची लाही लाही होतेय. तुमचं रक्त एवढं थंड कसे. माझ्या शेतकरी मित्रांनो! आतातरी या राक्षसी भांडवलशाही सरकारचे भक्त अथवा भाट होणे टाळा, भविष्य भयंकर आहे.
रासायनिक खतांची सरकारी कंपनी माननीय मोदी ह्याना विकायची आहे. त्यांचा मालक त्यांना हे सगळं करायला भाग पाडतो. माननीय मोदी हे अदानी-अंबानी यांचे बाहुले झालेत. एकीकडे २०२० खरीप हंगाम मातीमोल झाला, पिकाचा एक दाणा घरात आला नाही, तरी पीकविमा मिळत नाही. हे कमी की काय खरीप हंगाम २०२१च्या पुढ्यात खताचे भाव दुप्पट करून मोदी सरकारने तुमचा अंत बघायची संकल्पना मांडली आहे. शेतकरी हे गाढव किती अन्याय सहन करू शकते, कधी याच कंबरडे मोडते व सर्व देशातील जमीन ही भांडवलादारांच्या घशात घालता येईल. ही योजना मुख्य या खतांच्या वाढीत दडलेली आहे.
मागील ६ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आम्हा शेतकरी बांधवांना हे केंद्र सरकार जुमानत नाही. कोरोनाने हिंदू माणसाना नदीत फेकून देऊन त्यांना दिसेल तिथे गाडा ही स्कीम सुरू आहे. तरी जर भक्ती आणि भाटगिरी संपत नसेल तर तुम्हाला कोणताही देव वाचवू शकतं नाही. पूर्ण देश भांडवलदारांच्या घशात घातल्या शिवाय हा फकीर झोळी घेऊन पळून जाणार नाही असेच दिसते .त्यांनी आधीच जाहीर सांगितले आहे. मेरा क्या है, मैं तो फकीर हूं झोला उठाके चला जाऊंगा। ह्यातच खरी मेख आहे. अंबाणी आणि अदानीला जगातील एक नंबर श्रीमंत करण्यासाठी देशातील प्रत्येक माणसाच्या जीवाची किंमत मोजावी लागली तरी हे कसाई सरकार मागे हटणार नाही.
शेतकरी मित्रांनो! मुळात तुम्हा आम्हाला शेतीच करू द्यायची नाही. हीच रणनीती ह्या केंद्र सरकारची आहे. शेती ही कॉर्पोरेटच्या हातात देऊन सर्व देश गुलाम करण्याचा नियोजन बंध कार्यक्रम पत्रिका तयार आहे. आज खताचे भाव दुप्पट. उद्या बीजं तिप्पट होईल. मात्र,तुमच्या आमच्या पिकाला भाव हा कवडीचा राहील. हीच रणनीती, हे मोठं षडयंत्र आहे, तुमची जमीन घेण्याचे. तीन काळे कायदे, आता जमीन पिकवणेच दामदुप्पट केले तर शेतकरी मरेल की वाचेल.अरे अंधभक्तानो जागे व्हा. तुमचा विनाश तुमच्या पुढ्यात उभा तुम्हीच केला. या ‘भांडवली-मनुवादी’ वृत्तीला हद्दपार करा. नाहीतर देश वाचणार नाही.आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालतील मात्र ह्या सरकारचे षडयंत्र जनतेला सांगत राहू.
खताचे भाव दुप्पट करणे म्हणजे काय? ह्याचा विचार करा. ही सहज साधी गोष्ट नाही. शेतकरी लोकांचे उत्पादन दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवणारा हा गारोडी निघाला. कोणत्याच प्रकारे शेती ही शेतकऱ्यांकडे कडे राहू नये हेच या दुप्पट भाववाढी मागील षडयंत्र आहे.
शेवटी अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना फसवलेच!
DAP चा दर होता १२०० रुपये, तो वाढवून १९०० रुपये केला गेला, त्यामुळे शेतकरी नाराज झाले आता डीएपी चा दर २४०० रुपये करून त्यावर १२०० रुपये सबसिडी देण्यात आली म्हणजे शेतकऱ्यांना पूर्वीच्याच दरात DAP मिळणार. ना नफा ना तोटा. खत कंपन्यांची सबसिडी मात्र वाढली आपण लुटले जात नाही म्हणून शेतकरी खुश. ७०० ऐवजी १२०० रुपये सबसिडी मिळणार म्हणून कंपन्या खुश.
चालू परिस्थितीत शेतकऱ्यांना १०० ते २०० रुपये फायदा करून दिला असता तर काय बिघडलं असतं? खतांवर काहीशे टक्के वाढवलेली सबसिडी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर वरची सबसिडी जशी हळूहळू लुप्त होत गेली तशीच लुप्त होणार. उकळत्या पाण्यात टाकलेला बेडूक जिवाच्या आकांताने उडी मारून बाहेर पडतो, मात्र थंड पाण्यात बेडूक टाकून पाणी हळूहळू गरम करत उकळवल की बेडूक तसाच राहून शेवटी मरून जातो. वेगळं काही झालं तर आनंद आहे पण आजवरचा सरकारचा अनुभव वाईट आहे म्हणूनच. बरोबर ना?
कंपन्यांच्या नफ्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी च ज्यांची नियुक्ती झाली आहे ते आपल्या मालकाचेच भले पाहणार…बाकी जय जवान वगैरे या सर्व निवडणुकीत शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्यासाठी च्या घोषणा आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर फॉस्फरिक अॅसिड, अमोनिया सारख्या रासायनिक द्रव्यांच्या ६० ते ७० टक्क्यांनी वाढलेल्या किमती खतदरवढीला कारणीभूत आहेत असं सरकार म्हणते.
मग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलियम पदार्थांच्या, कच्चा मालाच्या किंमती कमी होऊन सुद्धा पेट्रोल शंभरी पार कसे गेले?
भाजपाच्या आणि सर्व पक्षाच्या आमदार-खासदार ह्यांच्या घरावर मोर्चे निघाले पाहिजेत. मात्र, तुम्हा-आम्हाला तर घरात डांबून ठेवलंय. कळतंय! काय सुरू आहे ते. गुमान घरात बसा. तुम्ही-आम्ही अघोषित आणीबाणीत जगत आहोत. फक्त ढुंगणावर फटके नाही तर आता पोटावर सुद्धा फटके मारणे सुरू झाले. जगा कसेही नाहीतर शेती अंबानीला द्या.त्याच्या शेतात मजूर म्हणून कामाला जा, एवढंच तुमच्या हातात आहे.गुलाम भक्त हो. देशाचं वाटोळं केल्या शिवाय तुमचे डोळे उघडणार नाहीत. आम्ही असू नसू मात्र हा देश राहिला पाहिजे. एवढेच.
प्रा. सतीश फाटक
संपर्क क्रमांक -८१६९७२०३४५
ई-मेल – presidentkokanmitramanch@ gmail.com
अध्यक्ष – कोकण मित्र मंच
राज्यसमन्वयक किसान क्रांती
पर्यावरण प्रेमी चंदन आणि तत्सम वनस्पती अभ्यासक.