मुक्तपीठ टीम
भारतीय जवानांच्या जोडीनं निमलष्करी दलातील जवानही देशाच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. केवळ देशासाठीचा पराक्रम नाही तर क्रीडा आणि अन्यही काही क्षेत्रातील त्यांची कामगिरीही कौतुकाचा विषय असते. आता कोरोना संकट काळातही जगातील सर्वात उंच शिखर असलेला माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी निमलष्करी दलातील भारतीय जवान सरसावले आहेत.
माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प परिसरात सध्या पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. जगभरातील गिर्यारोहक एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या टेंट सिटीत आहेत. गिर्यारोहक आणि त्यांच्या टीमसाठी तेथे ५० पेक्षा जास्त तंबू बांधलेले आहेत. याच टेंट सिटीत आपल्या भारतीय सैनिक गिर्यारोहकांच्या टीमचाही समावेश आहे. ते या महाशिखरावर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते आजच आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या या गिर्यारोहक पथकात सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि आयटीबीपीचे ८ कर्मचारी, बीएसएफ आणि एसएसबीचे ३ जवान आहेत. गिर्यारोहकांच्या ३० सदस्यांच्या ग्रुपचे नेतृत्व आरईपीएस रघुबीर लाल करीत आहेत. ही टीम आजपासून या मोहिमेला प्रारंभ करेल. सीएपीएफच्या म्हणण्यानुसार, एव्हरेस्टवर विजय मिळविणाऱ्या संघातील पाच सदस्य ल्होत्सो (८,५१६ मी) वर विजय मिळवतील, जे जगातील चौथ्या क्रमांकाचे शिखर आहे. इतर गिर्यारोहक ८ हजार ८४८ मीटर सर्वोच्च उंचीच्या माऊंट एव्हरेस्ट सर करतील.