मुक्तपीठ टीम
राज्यातील सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या पंधरा दिवसात तिसऱ्यांदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुरुवात झाली होती, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाने. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला. आता वादात सापडलेले तिसरे नेते आहेत कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे. मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी वादाचा इजा-बिजा-तिजा झाला आहे.
नवाब मलिकांच्या जावयाला अटक
अभिनेता सुशांत सिंग राजपुत आत्महत्याच्या प्रकरणानंतर एनसीबीने अंमली पदार्थांची होणारी तस्करी करणाऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या माध्यमातून तपास सुरू असताना आता या तपासाची व्याप्ती राजकारण्यांपर्यंत पोहचली आहे. या प्रकरणात आता एनसीबीने महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना बुधवार, १३ जानेवारी रोजी अटक केली आहे. तसेच ८ तासांच्या चौकशी दरम्यान एनसीबीला समीर खान आणि ब्रिटीश ड्रग्ज पेडलर करण सजनानी यांच्यातील व्यवहाराची माहिती घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने गेले काही दिवस केलेल्या छापेमारीत २०० किलो अमली पदार्थ जप्त केले, त्यानंतर कोट्याधीश बिल्डर करण सजनानीच्या चौकशीतून समीर खान यांचे नाव समोर आले. समीर खानने २० हजार रुपये करण सजनानी याला पाठविले होते. तसेच त्यांनी पाठविलेले हे पैसे अमली पदार्थ खरेदी करण्यासाठीच हस्तांतरीत केल्याचे एनसीबीला पुरावे सापडले आहेत. त्यानंतरच समीर खानला अटक करण्यात आली आहे. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिचा तो पती आहे.
तसेच एनसीबी आज समीर खान याला वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीसाठी इजा-बिजा-तिजा -१
मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप, पत्रकार परिषदेत शेख यांना अश्रू अनावर
मेहबूब शेख यांनी १४ नोव्हेंबर रोजी भेटायला बोलावून बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेनं औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी त्यांच्यावरील बलात्काराचा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. पत्रकार परिषदेत मेहबूब शेख यांना अश्रू अनावर झाले होते. ‘मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. माझे मोबाइल कॉल रेकॉर्ड तपासा, अगदी नार्को टेस्टही करा. दोषी असलो तर फासावर जायला तयार आहे,’ असे शेख यांनी सांगितलं आहे.
मात्र, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेख यांच्यावर कारवाईची मागणी केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्याचे मानले जाते.
राष्ट्रवादीसाठी इजा-बिजा-तिजा : २
पोलीस धनंजय मुंडेचा जबाब नोंदवणार, ब्लॅकमेलिंगसाठी बदनामीचा मुंडेंचा प्रत्यारोप
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका गायिकेने बलात्काराचा आरोप केला आहे. मुंडे यांनी या प्रकरणी जाहीर निवेदन करून सदर गायिकेच्या आरोपांमागे ब्लॅकमेलिंग आणि बदनामीचा हेतू असल्याचा आरोप केला आहे. मात्र, त्यांनी निवेदनात सदर गायिकेच्या बहिणीशी असलेल्या संबंध स्वीकारले आहेत. तिच्या दोन मुलांना स्वत:चं नाव देऊन सांभाळत असल्याचंही सांगितले आहे. भाजपने त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादीसाठी इजा-बिजा-तिजा : ३
मलिकांच्या राजीनाम्याची मागणी, कायद्यासमोर सर्व समान असल्याची मलिकांची भूमिका
नवाब मलिक यांच्या जावईला एनसीबीने अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलीक यांच्यावर टीका केली आहे. सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा जावयाचा एनसीबीच्या चौकशीत अमली पदार्थ तस्करीच्या घोटाळ्यात समावेश असल्याचे आढळले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. मलिक यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना कायद्यापुढे सर्व समान असल्याचे आहेत. कायद्यापुढे कोणीही मोठे नाही, असे सांगतानाच सत्यच जिंकेल असे म्हटले आहे.
अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात जावयाला अटक करण्यात आल्यामुळे नवाब मलिक यांच्यासमोरच्याही अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.