अपेक्षा सकपाळ
गडचिरोली म्हटले की भल्याभल्यांचा थरकाप उडतो. तिथं काही चांगलं होतच नसणार असाच अनेकांचा समज. त्यातही पुन्हा “तुला गडचिरोली दाखवेन” सारख्या डायलॉगनी तर तो गैरसमज अधिकच वाढवला आहे. तेथे असलेल्या नक्षलवादाची दहशत झुगारत चांगलंही खूप सुरु असतं. आपला गाव सुधरवू पाहणारी भाग्यश्री लेखामी ही तरुणी म्हणजे गडचिरोलीतील आशेचा किरण.
भामरागडपासून २५ किलोमीटर अंतरावर कोठी आहे. या गावच्या ग्रामपंचायतीची सरपंच आहे भाग्यश्री लेखामी. नव्या विचारांची. गावासाठी काही वेगळं करण्याचं स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडणारी. कोरोना संसर्गातून वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. त्यासाठी सतत फिरणे. तिथं गावकऱ्यांमध्ये असलेल्या अंधश्रद्धा दूर करणे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
या भोळ्या गावकऱ्यांची ही २१ वर्षांची सरपंच तरुणी समजूत काढते. कधी लेक होऊन तर कधी ताई होऊन तर कधी नात होऊन ती गावकऱ्यांना प्रेमानं समजवते. तिने आपल्या प्रयत्नांनी आणि प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी रुग्णालयाच्या मदतीने गावात लसीकरण पूर्ण केले आहे.
सरपंच भाग्यश्री लेखामीची हिंमत
- भाग्यश्री लेखामी ही त्याच गावातील आहे.
- तिची आई अंगणवाडी सेविका असून वडील शिक्षक आहेत.
- आपल्या लेकीच्या समाजसेवेच्या निर्णयासोबत संपूर्ण कुटुंब उभे आहे
- एक काळ असा होता की नक्षलवाद्यांच्या भीतीने गावात सरपंच होण्यासही तयार नव्हते.
- नक्षलवाद्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सरपंचपदाच्या निवडणुकीत उभे राहत नव्हते.
- भाग्यश्रीने हिंमत दाखवली. तिने निवडणूक लढविली आणि २०१९ मध्ये ती गावची पहिली सरपंच बनली.
- भाग्यश्री घाबरत नाही, मोटरसायकलने फिरत लोकांची सेवा करत असते.
- ‘मुक्तपीठ’शी बोलताना तिने घाबरायचे कारण नाही, कारण मी लोकांच्या भल्यासाठी काम करते.
- मी याच मातीतील आहे. लोक मला ओळखतात. माझे काम जाणतात, त्यामुळे मला काही भीती नाही, असे सांगितले.
- लसीकरणाबद्दल खूप गैरसमज असल्याने गावकरी लस घेत नाहीत. त्यामुळे मी त्यांची लेक, बहिण, नात अशा भूमिकेतून समजवते, ते माझे ऐकतात, असेही ती म्हणाली.
पाहा व्हिडीओ: