अनंत साळी
सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील नऊजणांना दोन वर्षांपासून वेठबिगारासारखं डांबून ठेवण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. जालना पोलिसांनी अखेर त्यांची सुटका केली आहे. त्यांना ज्या मुकादमाने कामासाठी नेले होते, त्यानेच सासऱ्याच्या मदतीने त्यांना डांबून ठेवले होते. जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांच्या पुढाकाराने आणि पोलिसांच्या मदतीने अखेर त्यांची सुटका झाली.
या प्रकरणी ऊसतोड मुकादम भरत आलदार आणि डिगांबर माने या बंधक बनवणाऱ्या विरोधात कदीम जालना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे.
वेठबिगारासारखं डांबून ठेवलेल्या मारिया घुलेने सांगितले की त्यांच्या कुटुंबाला दोन वर्ष वेठबिगारासारखं ठेवून घेतलेलं होतं. त्यांनी सुरुवातील पाच महिने कर्नाटक, नंतर घुंमशी आणि पट्टापाडा येथे ऊसतोड केली. त्याचे त्यांना पैसेही मिळाले, परंतु जेव्हा घरी जाण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांना डांबून ठेवण्यात आले. त्यांच्याकडून उसतोडीच्या बहाण्याने शेतीची काम करून घेण्यात आली.
मारीया घुलेने दवाखान्यात जाण्याचं निमित्त करून जालनाला आपल्या भावाकडे गेली. नंतर भावासोबत जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांना तिने सर्व हकिकत सांगितली. आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पुढाकाराने आणि पोलिसांच्या मदतीने बंधक असलेल्या ९ जणांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी ऊसमुकादम भरत आलदार आणि दिगंबर माने या डांबून ठेवणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पुढील तपास सोलापूर पोलीस करणार आहेत