मुक्तपीठ टीम
मराठवाड्यातील खरीपाची पिके अतिवृष्टीने अनेक मोठ्या प्रमाणात उध्वस्त होऊनही पिक विम्यातून वगळण्यात आली आहेत. ती नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुके समाविष्ट करणे आवश्यक आहे, त्यामुळे सरकारने त्वरित पिक विमा नुकसानभरपाई अशी मागणी नांदेडमधील तुषार देशमुख या तरुण शेतकऱ्याने खुल्या पत्राद्वारे केली आहे.
तरुण शेतकऱ्याचे कृषिमंत्र्यांना खुले पत्र
प्रति,
मा. दादाजी भुसे,
कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य
महोदय,
मराठवाड्यात मुख्यतः गेल्या खरीप हंगामात वास्तवात अतिवृष्टी, बोगस बियाणे यामुळे दुबार पेरणी ही दोन्ही अस्मानी, सुलतानी संकटे आलेली होती हे आपल्याला चांगल्या पैकी ज्ञात आहे. विशेषतः अतिप्रमाणात झालेल्या पावसामुळे सोयाबिन, तुर,मुग, उडीद, या पिकांचे नुकसान झालेच, शिवाय हदगाव/हिमायतनगर तालुक्यातुन वाहणाऱ्या पैनगंगा, कयाधू नद्या, पैनगंगा ईसापुर राज्यात क्रमांक २ चा प्रकल्प आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने नदीपात्राव्दारे पाण्याचा विसर्गही करण्यात येत होता. त्यामुळे होती नव्हती अशी सर्व पिके उध्वस्त झाली. संपूर्ण मराठवाडा अतिवृष्टीने नुकसानग्रस्त होता. पण हदगाव/ हिमायतनगर ही दोन तालुके पैनगंगा/कयाधू ह्या नद्यांच्या पुराच्या तडाख्याने उद्धवस्तच झाली. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, व मुंबई येथे प्रत्यक्ष आपल्याला झालेल्या नुकसानीची मागील चार महिन्यापुर्वी निवेदनाव्दारे कल्पना पिक विम्या व्दारे मदतीची कल्पना दिली होती. आपल्या कार्यालयाकडून केवळ पाठपुरावा संबंधी विचारले असता कृषी आयुक्त पुणे/संबंधित विमा कंपनी यांच्याशी चर्चा सुरू आहे असे वेळोवेळी निरर्थक उत्तराशिवाय, संदेशाशीवाय काहीच प्राप्त झाले नाही. तोपर्यंत आमच्या कडील काही भागात पिक विमा मंजुर झालेला असताना अजुनही किती दिवस चौकशीच्या गोड आश्वासनाच्या नावाखाली या मुख्य प्रश्नापासून पळ काढण्याचा प्रयत्न दिसून येतोय.
कोरोना परिस्थितीची दीड वर्षापासून, शेतकरी झळ सोसतोय. प्रलंबित कर्जमाफी, अशा अनेक संकटात असताना खरीप हंगाम पूर्णपणे गेलेला असताना या संकटाचा सामना आता सहन करु शकणार नाही. त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आपली असेल. आपणास नम्र निवेदन. पुनश्च सखोल विचार करुन संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तुम्हाला मोठ्या अपेक्षेने सत्तेवर आरुढ केलंय त्याचं देणं म्हणून तरी न्याय द्यावा, हीच अपेक्षा!
आपला नम्र
तुषार देशमुख
नांदेड 8888319919