मुक्तपीठ टीम
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना लसींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. बऱ्याच लोकांना नोंदणी करूनही लस मिळत नाही. त्याचा फायदा घेण्यासाठी व्यावसायिक पुढे आले नसते तरच नवल. दिल्लीतील एका ट्रॅव्हल एजन्सीने वॅक्सिन टुरिझम पॅकेज जाहीर केले आहे. दुबईतील ट्रॅव्हल एजेन्सी अरेबियन नाईट टूर्सच्या वतीने दिल्ली ते मॉस्को २३ रात्रींचे टूर पॅकेज जाहीर झाले आहे. रशियातील मुक्कामात स्पुटनिक व्ही लसीचे दोन डोसही मिळणार आहे.
दिल्ली ते मॉस्को असा २३ दिवसांचा दौरा आहे. २९ मे रोजी पहिली टूर रशियाला रवाना होणार आहे. यामध्ये २८ पर्यटकांचा समावेश आहे. तर त्यापुढील टुर्स या ७ जून आणि १५ जूनला रवाना होतील. या पॅकेजला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्व टुर्स वेगाने बूक होत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
वॅक्सिन टुरिझम पॅकेजमध्ये काय आहे?
• कंपनीने २३-रात्रींच्या पॅकेजची ऑफर दिली आहे.
• या पॅकेजमध्ये स्पुटनिक-व्हीचे दोन डोस प्रवाशांना ऑफरचा भाग म्हणून दिले जातील.
• लस संबंधित प्रमाणपत्र दिले जाईल.
• सेंट पीटर्सबर्ग येथे चार दिवस मुक्काम असेल.
• या पॅकेजची एकूण किंमत १ लाख ३० रुपये आहे.
डोस कधी दिले जातील?
• मॉस्कोत पोहचल्यानंतर स्पुतनिक लशीचा पहिला डोस देण्यात येईल.
• २१ व्या दिवशी स्पुतनिक लशीचा दुसरा डोस मिळेल.
• दोन डोसमध्ये २१ दिवसांचा कालावधी असेल.