मुक्तपीठ टीम
देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणाची जोमात तयारी सुरू असताना महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कमी डोस पुरवले असल्याचा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच केंद्राकडून करण्यात आलेल्या सुचनेनंतर लसीकरण केंद्रांची संख्याही कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने आज नऊ ते साडे नऊ लाख डोस उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र, बफर स्टॉक सहित बोलायचे झाल्यास १७ ते साडे सतरा डोसची गरज आहे. त्यामुळे हे डोस कमीच आले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जो व्यक्ती लस घेईल त्याला ती पूर्ण द्या. पण त्यामुळे अपेक्षेच्या तुलनेने ५५ टक्केच लोकांना पुरतील एवढेच लसीचे डोस आले आहेत, असे राजेश टोपे म्हणाले.
तसेच १६ जानेवारीला होणाऱ्या लसीकरणाबद्दल बोलताना टोपे म्हणाले की, त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरातील लसीकरणाचे उद्घाटन करतील, असे टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मोठ्या स्तरावर लसीकरण करू नका असे सांगितले असल्याने ५११ लसीकरणाच्या केंद्रांवरून ती संख्या ३५० करण्यात आली. तसेच पहिल्या दिवशी प्रत्येक केंद्रावर १०० डोस म्हणजेच ३५ हजार जणांना लस देण्याचे मानस असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.