मुक्तपीठ टीम
कोकणात नुकत्याच येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोकणचा दौरा केला. याच दौ-याचा एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी मेढा येथील आरोग्य उपकेंद्राच्या नुकसानीची पाहणी केली. याच ठिकाणी भाजपाचे नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी यांनी नागोठण्यातील आरोग्य समस्येबाबत देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकरांना निवेदन देऊन साकडे घातले.
तौक्ते चक्रीवादळामुळे नागोठण्याजवळील मेढा आरोग्य उप केंद्राच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे इतर आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते. त्यावेळी नागोठणा भाजप शहर अध्यक्ष सचिन मोदी यांनी नागोठणे येथील विविध आरोग्य समस्येबाबत निवेदन सादर केले. यावेळी भाजपाचे नागोठणे भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागोठणे गावाची लोकसंख्या जास्त असून लसीकरणासाठी येथील नागरिकांना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. त्यामुळे तेथे खूपच गर्दी होते. त्यामुळे नागोठणे शहरात खासगी दवाखान्यात लसीकरणासाठी मंजुरी द्यावी अथवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लसीकरण केंद्राला शासनस्तरावरून जलद गतीने मंजुरी मिळावी अशी विनंती सचिन मोदी यांनी निवेदनात केली आहे. त्यामुळे लसीकरण जलद गतीने होऊन कोरोना संसर्ग रोखण्यास लोकांना मदत होणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना गावाच्या बाहेर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
तसेच नागोठणे मध्ये ग्रामपंचायतीची एकच रुग्णवाहिका उपलब्ध आहे. मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येला ती अपुरी पडत आहे. त्यामुळे नागोठणे साठी एक रुग्णवाहिका त्वरित द्यावी व नागोठण्यात सद्यस्थितीत ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन मशीन उपलब्ध नाही. त्यामुळे गरजेच्या वेळी अत्यंत उपयुक्त ठरणारी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन तरी तातडीने उपलब्ध करावे अशी मागणी निवेदनाद्वारे शहर अध्यक्ष सचिन मोदी यांनी केली आहे.
सचिन मोदी यांच्या निवेदनाची त्वरित दखल प्रवीण दरेकर यांच्याकडून घेण्यात आली असून सदर मागणी आमदार रवी शेठ पाटील यांच्या सहकार्यातून लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील यांनीही नागोठण्याचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती प्रवीण दरेकर यांना केली.