तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या मुंबई मॉडेलचं जगभर कौतुक होत असतानाच एक अलर्ट आहे. हा रेल्वे अलर्ट आहे. कारण हा आहे मुंबईत रेल्वेमार्गे मोठ्या संख्येनं परतत असणाऱ्या प्रवाशांबद्दल. या महिन्यात आतापर्यंत उत्तर भारतातील कोरोना उफाळलेल्या राज्यांमधून लाखो प्रवाशी मुंबईत आले आहेत. आजही येत आहेत. या प्रवाशांची ४८ तासांमध्ये केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे बंधनकारक आहे. मात्र, कागदोपत्री असणारे नियम हे मनुष्यबळ आणि इतर अनेक ज्ञात-अज्ञात कारणांमुळे १०० टक्के पाळले जातातच असे नाही. ते पाळले गेलेच पाहिजेत. नाहीतर महामुंबईतील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर या पाच जिल्ह्यांध्ये आटोक्यात येताना दिसत असलेली परिस्थिती पुन्हा बिघडण्याची भीती आहे.
उत्तर भारतातील राज्यांकडे बोट दाखवून मुंबई महाराष्ट्राच्या हितासाठी काही लिहिले की अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. ते विसरतात की यात काही प्रांतवाद नाही. त्यांना ठाऊकही नसते की मुंबईकरांच्या हिताचे बोलले जाते ते काही फक्त मराठी मुंबईकरांच्या हितासाठी नसते. ते सर्वच अडीच कोटी महामुंबईकरांच्या आणि सव्वा कोटी मुंबईकरांच्या हितासाठी असते. मुंबई मनपाच्या हद्दीत जेवढे उत्तर भारतीय असतील तेवढे कदाचित यूपी-बिहारच्या अनेक शहरांमध्ये नसतील. पण तरीही नको तो रंग देण्याचा प्रयत्न किमान या आरोग्य हिताच्या मुद्द्यावर केला जाऊ नये. यासाठी हे स्पष्ट केले. पुन्हा उत्तर भारत म्हटले की अशांना उत्तर प्रदेश, बिहारच आठवतात. कारण तेथून आलेल्यांना मतपेढी म्हणून वापरायची वृत्ती. पण या बातमीत केवळ ही दोन राज्यं नाही तर राजस्थान आणि पंजाबचाही उल्लेख आहे. त्यामुळे ही बातमी गंभीरतेने घ्यावी, अशीच आहे.
मुळात त्यासाठी मी जो आधार घेतला आहे तोसुद्धा मुद्दामच नवभारत टाइम्स या अग्रगण्य हिंदी दैनिकातील दामोदर व्यास यांच्या बातमीचा आहे. टाइम्स समुहाच्या या दैनिकाचा भर उगाचच सनसनाटीवर दिसत नाही. त्यातही पुन्हा दैनिक हिंदी, बातमी लिहिणारा पत्रकार हिंदी भाषिकच, त्यामुळे विनाकारण ज्यांना वेगळ्या संशयाची उबळ येईल, त्यांनी हे आधीच लक्षात घ्यावे. या बातमीनुसार मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचणी तपासण्यांच्या बाबतीत काहीसा ढिलेपणाच दाखवला जात आहे. यात रेल्वे, मुंबई मनपा, राज्य सरकार सर्वांचीच जबाबदारी आहे.
मुंबई रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता गेली अनेक वर्षे रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसाठी लढत आहेत. त्यांनीही बाहेरील राज्यांमधून मुंबईत येणाऱ्यांच्या तपासणीतील हयगय होत असल्याचे मांडले. पण त्यांनी कारणही स्पष्ट केले. ते म्हणाले, रेल्वे एवढा अफाट परिसर जणू उघडे आकाश. लक्ष ठेवणे सोपे नसतेच. त्यात पुन्हा अपुरी यंत्रणा. कोणी तपासणी करायची ते स्पष्ट नाही. रेल्वे तिकीट तपासणीसांकडे जबाबदारी दिली तर रिझर्व्ह तिकीटासोबतच ते निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्रही तपासतील. पण तशी स्पष्ट व्यवस्था केलेली नाही. मुंबई, मनपा, राज्य सरकार आणि रेल्वे यांच्या घोळात तपासणी म्हणावी तशी होत नसावीच.
गंभीरतेने विचार करावा अशी आकडेवारी
• पश्चिम आणि मध्य रेल्वेने लाखो प्रवाशी मेच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये परतले आहेत.
• सुत्रांवर विश्वास ठेवला तर या प्रवाशांची म्हणावी तशी तपासणी होत नाही.
• रेल्वेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत सुमारे ३ लाख लोक रेल्वेने मुंबईत परतले आहेत.
• जर स्त्रोतांचा विश्वास असेल तर त्यांच्या चाचणीमध्ये हलगर्जीपणा आहे, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
• परतलेल्यांपैकी बहुतेक लोक उत्तर भारतातून परत आले आहेत.
• पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार १ मे ते ९ मे दरम्यान १ लाख ५३ हजार ८२ लोक मुंबईला परतले आहेत. यापैकी ६० हजाराहून अधिक लोक राजस्थानमधून परतले आहेत.
• मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, २ ते ९ मे दरम्यान सुमारे २ लाख प्रवासी मुंबईत परत आले आहेत. यातील ७०% प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आले आहेत.
• पश्चिम रेल्वेने उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड येथून जवळपास ५० हजार लोक मुंबईत परतले आहेत.
• पश्चिम रेल्वेने १ मे ते ९ मे या कालावधीत राजस्थानमधून येणार्या गाड्यांमधून ६० हजार ३७५ प्रवाशी मुंबईत आले आहेत.
उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्या ८५ टक्क्यांपेक्षा जास्त भरलेल्या
• उत्तर भारतातून येणाऱ्या रेल्वे गाड्या भरून येत आहेत.
• यूपीच्या गोरखपूरहून येणाऱ्या गाडीची ऑक्युपेंसी ९९.३३ टक्के होती.
• राजस्थानहून येणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसची ऑक्युपेंसी ८४.९६ टक्के होती.
• पंजाबमधून येणारी पश्चिम एक्स्प्रेसची ऑक्युपेंसी १४० टक्के होती.
राजकारण होत राहिल. आरोप – प्रत्यारोप केले जातील. पण किमान कोरोनासारख्या जीवना-मरणाच्या विषयात ते केले जाऊ नये असे वाटते. तसे केले जाते. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडते. रेल्वे केंद्राचा विषय म्हणून इतरांनी आरोप करावे आणि भाजपाने बचावार्थ यावे असे नको. कारण राज्य सरकार आणि मुंबई मनपाचीही जबाबदारी आहे. आपण साऱ्यांनाच कोरोना रोखावा लागेल. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात भारतात आहेत तसेच पंजाब, राजस्थान, महाराष्ट्रही भारतातच आहेत. त्यामुळे सर्वच राज्यांची सर्वांनीच काळजी घेऊया. मुंबई-महाराष्ट्रात येणारे मग ते कुठूनही असो त्यांची कसून कोरोना आरोग्य तपासणी झालीच पाहिजे. राजकारणापलीकडेही जीवन असते. मानवी जीवनापेक्षा मोठे काही नसते. ते वाचवण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. नाहीतर राजकारण्यांनो, तुमचा मत मागण्याचा अधिकारच मयत होईल!