मुक्तपीठ टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपासंदर्भात तक्रारदार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. मुंबईतील कोकण भवन येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्यालयाच आज वाजल्यापासून जबाब नोंदवला जाणार आहे. घाडगे यांच्या तक्रारीवरुन परमबीर सिंह यांच्यासह ३३ वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भीमराव घाडगे आज मुंबईत आले आहेत. घाडगे सध्या अकोल्यात जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. घाडगे यांच्या तक्रारीवरूनच परमबीर सिंह यांच्यासह ३३ वरिष्ठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात अकोल्यातील सीटी कोतवाली पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आजच्या जबाबात घाडगे परमबीर सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात अतिशय महत्वाची माहिती आणि दस्तावेज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, यामुळे घाडगेंच्या आजच्या जबाबानंतर परमबीर सिंह यांच्याभोवतीचे फास आणखी आवळले जाण्याची शक्यता आहे.
परमबीर सिंह यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याचेच भ्रष्टाचाराचे आरोप
• मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर त्याच्याच खात्यातील एका पोलीस अधिकाऱ्यानं भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
• एकूण ३३ अधिकाऱ्यांविरोधात २७ कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
• मुंबई पोलीस दलाचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारी नंतर अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भष्टाचाराचा आरोप करून मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.
• या अर्जात त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
• दरम्यान, परमबीर सिंह हे २०१५ ते २०१८ याकालावधीत ठाणे पोलीस आयुक्त असताना आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मनमानी कारभार करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप घाडगे यांनी पत्रात केला होता.
• पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावरच नाहीतर त्यांच्या कुटुंबावरही अत्यंत गंभीर आरोप लावले होते.
• त्यांनी केलेल्या आरोपांनुसार, परमबीर सिंह यांची पत्नी इंडिया बुल्स कार्यालयात काम करतात. जिथे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
• त्याचसोबत परमबीर सिंह यांचा मुलगा रोहन याचा सिंगापूरमध्ये मोठा व्यवसाय असल्याची माहितीही या पत्रातून देण्यात आली आहे.
• परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे मुलाच्या सिंगापूरमधील व्यवसायात गुंतवले असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.