मुक्तपीठ टीम
पत्रकारांना “फ्रन्टलाईन वॉरियर्स” म्हणून मान्यता द्या म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्रं लिहिणारे मंत्री कॅबिनेटच्या बैठकीत या विषयावर ब्र देखील काढत नसल्याचे पुन्हा दिसून आलं आहे, असं महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी म्हटले आहे.
बुधवारी कॅबिनेट बैठक होती.. बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले गेले मात्र ज्या डझनभर मंत्र्यांनी पत्रकारांना कोरोना वॉरियर्स म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली होती त्यापैकी एकही मंत्री या विषयावर बोलला नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे मंत्र्यांचा पत्रप्रपंच हा दिखावाच होता हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, याबद्दल देशमुखांनी नाराजी व्यक्त केली.
देशभरातील १२ राज्यांनी पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून जाहीर केले असून त्यांना विविध सुविधा दिल्या आहेत.. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल १३२ पत्रकारांचे कोरोनाने बळी घेतले असले तरी सरकार पत्रकारांना फ्रन्टलाईन वॉरियर्स म्हणून जाहीर करायला तयार नाही.
पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदेने इ-मेल पाठवा आंदोलन केले, महाराष्ट्र दिनी आत्मक्लेष आंदोलन केले मात्र सरकार त्याची दखल घेत नाही.. त्यामुळे पत्रकारांमध्ये मोठी नाराजी आहे.. सरकार किती पत्रकारांचे बळी गेल्यानंतर पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करणार आहे? असा सवाल एस.एम.देशमुख यांनी विचारला आहे..