सरोज नारायण पाटील
शनिवार ८मे चा तो दिवस. माझ्यासाठी जणू आभाळ कोसळल्याचीच बातमी घेऊन आला.थोर सामाजिक विचारवंत आणि शेतकरी, कष्टकऱ्यांचे नेते प्रा एन. डी.पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि आख्खं घर माझ्याभोवती फिरु लागलं. पायाखालची जमीन सरकली. अंगातलं त्राण एकाएकी नाहीसं झालं. मती खुंटली. नेमकं काय करावं सुचेना.डोकं एकदम बधिर झालं . पर्याय नव्हता. स्वतःला सावरलं. हातापायात बळ एकवटून हक्काच्या अॅपल हास्पिटलला फोन केला. काही मिनिटातच अॅम्ब्युलन्स आली आणि गोरगरिबांचे तारणहार असलेल्या एनडींना घेऊन बघता बघता निघूनही गेली. मनावर प्रचंड तणाव होता. काय करावं? कुणाशी बोलावं? काहीही सुचत नव्हते. त्यातूनही संयम ठेऊन निवडक लोकांशी फोनवर बोलले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यावर माझ्या परस्पर हीतचिंतकांनी हालचाली सुरु केल्या. माझं मन मात्र अस्थिर होतं. त्यांना मला धड भेटता येत नव्हतं की मनभरुन त्यांना बघताही येत नव्हतं. मनाची घालमेल वाढत होती. दडपण येत होते. नको नको त्या विचारांनी मन बेचैन व्हायचे. गेल्या आठ – दहा दिवसात मनावर प्रचंड ताण होता आणि आठ – दहा दिवसांच्या प्रदीर्घ लढाईनंतर ब्याण्णव वर्षांचे तरुण एन.डी.पाटील कोरोनावर मात करुन नेहमीप्रमाणे लढाई जिंकलेल्या यशस्वी योद्घयासारखे घरी परतले आणि माझा जीव भांड्यात पडला…
जगावर कोरोनाचं संकट घोंघावायला लागल्यापासून गेले वर्ष सव्वावर्ष मी कटाक्षाने त्यांना जितकं म्हणून सुरक्षित ठेवता येईल तितकी त्यांची प्राणपणाने काळजी घेत आले होते. नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरलेल्या या माणूसवेड्या माणसाला हा एकलेपणा असह्य करणारा होता. पण पर्याय नव्हता. जितकी म्हणून काळजी घेता येईल, तितकी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या व्यवस्थेसाठी मुलांनी तीन तीन प्रशिक्षित तरुण केअर टेकर ठेवले होते. व्यवस्थेत कशाचीही कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेतली होती. मुलं दिवसातून अनेकदा फोनवर त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची. काळजीसाठी सूचना करायची. एनडींवर जीव टाकणारे त्यांचे कितीतरी कार्यकर्ते या काळात त्यांना भेटायला यायचे. एकदा दुरुन तरी नुसतं बघतो म्हणायचे. त्यांच्या भावना मला कळायच्या. मात्र अशा दुरुन बघण्यातही धोका वाटायचा. माझा नाईलाज व्हायचा. मग कधी त्यांना प्रेमाने समजाऊन सांगून प्रसंगी कार्यकर्त्यांचा रोष पत्करून मी त्यांना जपत आले होते. मात्र त्यांची काळजी वाहाणाऱ्या केअर टेकर मुलाला दोन तीन दिवस सर्दीताप आला. त्याने तो अंगावर काढला आणि वस्तुस्थिती लपवून तो कामावर येत राहिला. नंतर त्याचा स्वॅब पाॅझिटीव्ह आला आणि त्याच्याशी आलेल्या निकटच्या संपर्कामुळे घोळ झाला. एनडींचा स्वॅबही पाॅझिटीव्ह आला. तरुणपणाच्या जोशावर आजारपण रेटून नेण्याचा केअर टेकर मुलाचा बेफिकीर स्वभाव नडला आणि गेले आठ – दहा दिवस काळजीच्या डोहात मी खोल बुडाले होते.
हे दिवस मी मोठ्या तणावात काढले. या काळात अनेकांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप मदत झाली.अॅपल हॉस्पिटलचे आणि तिथल्या सर्व स्टाफचे मी मनापासून आभार व्यक्त करते. डाॅ. भुपाळे आणि मिसेस भुपाळे यांचे आभार कोणत्या शब्दात व्यक्त करावेत? तिशी पस्तीशीचे धडधाकट तरुण कोरोनाला बळी पडत असताना जिवाचे रान करुन त्यांनी एनडींना कोरोनाच्या दाढेतून अक्षरशः खेचून बाहेर काढले. अॅपल हॉस्पिटलच्या व्यवस्थापिका गीता मॅडम यांची धावपळ कामी आली. कमालीच्या बाक्या परिस्थितीत सुद्धा हाॅस्पिटलच्या परिचारिका आणि वाॅर्डबाॅयनी एनडींना कोरोना पॉझिटीव्ह परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यांच्या सेवाभावीवृत्तीला माझा मनोभावे सलाम. ना पुरेशी विश्रांती, ना कुटुंबियांचे दर्शन, आजूबाजूला कोरोनाची प्रचंड दहशत अशा परिस्थितीत तहानभूक विसरुन आप्तस्वकीयांचा दुरावा सहन करीत, गेले वर्ष सव्वावर्ष अथकपणे अहोरात्र रुग्णांची ते सेवा करताहेत. सेवाभाव हाच स्थायीभाव मानून रात्रंदिवस युद्धभूमिवर सैनिकांची सेवा करणाऱ्या आणि ‘लेडी वुईथ लॅम्प’ म्हणून जिचा सन्मानपूर्वक गौरव केला जातो त्या फ्लोरेन्ट नायटीगेलचा १२ मे हा स्मृतिदिन. ‘जागतिक परिचारिका दिन’. हे सगळे तिचेच वारसदार. त्यांचा मला अभिमान वाटतो. पुरेशा वेतनाचे, हक्काच्या रजेचे असे त्यांचे कितीतरी प्रश्न आजही प्रलंबित आहेत खाजगी हाॅस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या परिचारिका आणि वाॅर्डबाॅयचे प्रश्न तर अधिक गंभीर आहेत..तरीही जिवाची बाजी लावून आपत्कालीन परिस्थितीतही जिवाची पर्वा न करता प्रतिकूल परिस्थितीशी ही लढाई ते लढताहेत. एका अर्थाने ते जीवनदातेच आहेत. खरं तर, त्यांचे प्रलंबित प्रश्न लवकर सुटायला हवेत.
मानसिक अशांततेच्या या काळात डाॅक्टर, परिचारिका, वाॅर्डबाॅय यांच्यासह नेहमी डोंगरासारखे मदतीला धावून येणारे माझे बंधु, देशाचे नेते शरद पवार, दुसरे बंधु प्रतापराव पवार ठामपणे माझ्या पाठीशी राहिले. मुंबई- पुण्यातून परिस्थितीवर ते नियंत्रण ठेऊन होते. परस्पर डाॅक्टरांशी बोलत होते. त्यांच्या आधाराशिवाय या परिस्थितीला मी सामोरी जाऊच शकले नसते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूरचे एस.पी. श्री. बलकवडे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य एम.बी. शेख यांच्यासह, वीज ग्राहक पंचायतीचे विक्रांत पाटील, प्रा.गायकवाड अशा एक ना अनेकांची मोलाची मदत मिळाली आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा हा बुलंद आवाज कोरोनाच्या तांडवातही ब्याण्णव्या वर्षी कोरानासारख्या गंभीर संकटावर मात करुन सुखरुपपणे घरी परतला. आयुष्यभर सावलीसारखी त्यांच्या सोबत असलेल्या माझ्यासारखीला आणखी काय हवे आहे? तसे पूर्वीही ते घरी कधीच नसायचे. पण आज आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना माझी आणि मला त्यांची गरज आहे. माझा श्वास सुखरुपपणे घरी परतला आणि आज मी समाधानानं भरुन पावले आहे.
(सरोज पाटील उर्फ माई यांचा महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव आणि अभ्यास आहे. सध्या त्या रयत शिक्षण संस्थेतही सक्रिय आहेत. पती प्रा. एन.डी. पाटील यांच्यासह समर्पित भावाने सामाजिक बांधिलकीनं सेवारत राहण्यासाठी त्या ओळखल्या जातात.)