मुक्तपीठ टीम
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या बुरशीजन्य रोगावर वेळीच उपचार करण्याची गरज असल्याने त्यासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ‘ऑपरेशन थिएटर’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन या रोगाला अटकाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
ज्या कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे किंवा ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांना म्युकर मायकोसिस हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांना डोळे आणि कानाला बुरशी आल्याने त्रास होतो. वेळीच उपचार मिळाले नाहीत तर डोळ्यांवाटे हा संसर्ग मेंदूमध्ये जाऊन रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे व एमएमआर क्षेत्रात या आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या रुग्णांवर वेळीच उपचार करून त्यांना कसा दिलासा देता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले. त्याशिवाय या रुग्णांवर उपचार करण्यासाठी निष्णात ईएनटी सर्जनची आवश्यकता असल्यामुळे ठाण्यातील नामवंत ईएनटी सर्जन डॉ. आशिष भूमकर आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी पालिकेला लागेल ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्याच नेतृत्वाखाली एक विशेष टीम कळवा रुग्णालयात तैनात करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. याशिवाय या रुग्णांना लागणारी औषधे, वैद्यकीय साधने आणि पुढे लागणारी ओपीडीची सुविधा पुरवण्याचे देखील निश्चित करण्याचे करण्यात आले.
म्युकर मायकोसीस या आजारासाठी लागणारी इजेक्शन्स महाग असल्याने त्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच त्यांचा पुरेसा साठा करण्याचे निर्देश शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिले. ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना हा आजार लवकर होत असल्याचे निदर्शनास आल्याने ज्या रुग्णांना मधुमेहासह कोरोनाही झाला होता, आशा रुग्णांची यादी तयार करून त्यांना वेळीच संपर्क करून त्यांना म्युकर मायकोसिसची लक्षणे दिसत नाहीत ना, याची तपासणी करण्याबाबत विचार करावा, अशी सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली.
रुग्णांवर वेळीच उपचार झाले तर म्युकर मायकोसिस झालेला रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो, त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णापर्यंत वेळच्या वेळी उपचार पोहोचायला हवेत, असे निर्देश शिंदे यांनी सर्वांना दिले. बैठकीला पालकमंत्री शिंदे यांच्यासह कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, ईएनटी तज्ज्ञ डॉ. आशिष भूमकर, कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयात सुरू असलेल्या लहान मुलांच्या खास वॉर्डच्या कामाचा आढावा देखील शिंदे यांनी या बैठकीत घेतला. त्यासोबतच जिल्ह्यातील ऑक्सिजन उपलब्धतेची माहिती देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.