गौरव पाटील
पालघर जिल्ह्यात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातल असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे तर मृतांच्या संख्येमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र असं असताना पालघरच्या आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार सातत्याने समोर येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत याचं कोणतेही सोयरसुतक आरोग्य विभागाला पडलेल दिसत नाही. त्याचं एक उदाहण म्हणजे कोरोना संकट काळात रुग्णवाहिका उपलब्ध नसताना असलेली रुग्णवाहिका भंगारात सडत पडलेली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्राला रुग्णांना ने आण करण्यासाठी रुग्णवाहिका दिल्या आहेत परंतु या रुग्णवाहिकांच्या देखभाल व दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने त्या मोडकळीस येऊन धूळ खात पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यातील काही शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकांची ही अवस्था आहे असं असताना जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या अत्यावश्यक सेवेकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय.
पालघर जिल्ह्यातील चिंचणी वाणगाव हा विभाग मोठा असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत या ठिकाणच्या रुग्णवाहिका गेल्या सात ते आठ महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून नादुरूस्त रुग्णवाहिकेची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे डिसेंबर २०२० मध्ये पत्रव्यवहार झालेला आहे. कोरोना काळ असतानाही सहा महिने उलटून गेले तरीही जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा झोपेत असल्याचं पाहायला मिळते. या पत्रावर कोणताही विचार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला नसल्याने अजूनही ही रुग्णवाहिका दुरुस्तीअभावी धूळ खात पडली आहे यामुळे चिंचणी वाणगाव सारखा मोठ्या लोकवस्तीचा विभाग असल्याने येथील शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल करणे किंवा त्याला इतरत्र हलवणे साठी कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आत्तापर्यंत अनेक वेळा स्थानिकांनी ही याबाबतीत तालुका आणि जिल्हा पातळीवर पाठपुरावा केला आहे तरीही आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेत आहे,. कोरोना काळात तर मोठ्या प्रमाणात या भागातील रुग्णांना रुग्णवाहिका विना हालअपेष्टांना सामोरे जावे लागले आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्रमगड या तालुक्यांना आमदार निधीतून १२ रुग्णवाहिका नुकत्याच देण्यात आले आहेत या अगोदर तिकडची परिस्थिती चिंचणी वाणगाव विभाग सारखीच होती सध्या वानगाव साठी एक रुग्णवाहिका आमदार निधीतून देण्यात आली आहे मात्र तीही रुग्णवाहिका तशीच उभी असून कोरोना रुग्णांसाठी कोणताही वापर होत नसल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले आहे.
त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर सध्या प्रश्नचिन्ह उभे राहिले असून जिल्ह्यातील व्हेंटिलेटर परजिल्ह्यात पाठवणे त्याच प्रमाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या अत्यावश्यक सेवेकडे दुर्लक्ष करणे या बाबी प्रकर्षाने पुढे येत आहेत यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रा साठी नवीन रुग्णवाहिका देण्यात यावी किंवा गेले काही महिने बंद असलेले रुग्णवाहिका तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
आता तपासणार, मग दुरुस्तीचा विचार!
आम्ही चिंचणी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून पुढील कार्यवाही करू, सदरची रुग्णवाहिका दुरुस्त होण्यासारखी आहे वा कशी ते तपासून दुरुस्तीचा निर्णय घेऊ, असे पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले.