मुक्तपीठ टीम
“मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयाने केली याचा फडणवीसजींना खरं तर आनंद वाटायला हवा होता. पण त्याची पोटदुखी व्हावी ही अपेक्षा नव्हती,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड केली जात नसल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या त्या आरोपावर सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन सावंत यांनी फडणवीसांच्या पत्रातील आरोपांबद्दल प्रत्यत्तर देत भाजपावरच आकड्यांच्या घोळाचा आरोप केला आहे. ते म्हणालेत, “खोट्या आकडेवारीचा मसीहा असलेल्या भाजपाचे सर्व मुख्यमंत्री आपल्या राज्यांमध्ये आकडे दडवतात व फडणवीसजी इथे चिंता व्यक्त करतात हे आश्चर्याचे आहे.”
मुंबईची सर्वोच्च न्यायालयाने वाखाणणी केली त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. तसाच तो सन्माननीय फडणवीस साहेबांनाही असला पाहिजे अशी अपेक्षा होती पण त्याऐवजी त्यांना पोटदुखी व्हावी हे दुर्दैव! pic.twitter.com/GOBN7hgQMo
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 8, 2021
सावंत यांनी फडणवीसांचे लक्ष आकडेवारीकडे वेधलंय, “दुसरी लाट सुरू झाली तेव्हा १० फेब्रु २१ ला मुंबईत ३.१३ लाख संकलीत रुग्ण व ११४०० संकलीत मृत्यू होते. आज ६.७१ लाख संकलीत रुग्ण व १३६८७ संकलीत मृत्यू आहेत. दुसऱ्या लाटेच्या ३ महिन्यात २२८७ मृत्यू आहेत. हा दर केवळ ०.७% दर आहे जो जगात कमी आहे. दिल्लीत आठवड्याला ३००० मृत्यू होत आहेत.”
“कोरोना व्यतिरिक्त मृत्यू कोरोना मृत्यूशी जोडले तरी हा दर ०.८% फारतर होईल. तो ही जगात कमी आहे. मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड हे मविआ नेत्यांबरोबर मेहनत घेत आहेत. भाजपाने पोटदुखीचा इलाज करावा व भाजपाशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडे लक्ष द्यावे”, असा टोलाही सावंत यांनी मारला आहे.