मुक्तपीठ टीम
संपूर्ण जगाला कोरोना संक्रमणात्रस्त करून सोडले आहे. मात्र, या साथीच्या रोगाच्या लसीकरणास भारतात १६ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. लसीकरणाच्या कर्यक्रमाची देशभर जय्यत तयारी सुरू झाली आहे. आज पहाटे साडेचारच्या सुमारास कोरोना लसीचे डोस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूमधून रवाना झाले आहेत. लसीचे कंटेनर सुरक्षित पोहचवण्यासाठी झेड प्लससारखा कडक पोलीस बंदोबस्त आहे. तर पुणे – मुंबई दरम्यान सुरक्षेबरोबरच ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात येत आहे.
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असणारी सीरम इंस्टिट्युट आपल्या पुण्यात आहे. तेथून लस देशभर पाठवण्यात येत आहे. पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहे. यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.
भारत सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे.
ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विकसित केलेली कोव्हिशिल्ड या लसीचा प्रत्येक डोस २१० रुपये किंमतीत मिळणार असल्याचे सीरमच्या अधिकाऱ्यानी सांगितले आहे.