मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीच्या साथीला आता दीड वर्षे होत आलं. कोरोनाविरोधातील युद्धात तुम्ही आम्ही केवळ काही बंधनं आलीत म्हणून कोरोना संकट काळात कुरकुर करतो. कुणी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं कळलं की बहुतेक लोक त्यांच्या घरापासूनही दूर राहू पाहतात. त्याचवेळी डॉक्टर आणि त्याच्या टीम मात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत अथक, सतत, निरंतर सेवारत असतात. अशा रुग्णांच्या संपर्कात राहणे हे त्यांच्यासाठीही धोक्याचेच. अनेक डॉक्टरांना रुग्णसेवेत कोरोनाची बाधाही झाली. काही रुग्णसेवेचं कर्तव्य बजावताना हुतात्माही झाले. पण क्वचितच कधी तरी आपण या आरोग्य रक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. खरंतर त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्यच.
नेमकं हेच एका संवेदनशील मनाच्या संदीप आचार्य यांच्या मनात आलं. गेली काही दशके पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवणारे संदीप आचार्य दैनिक लोकसत्ताचे सहसंपादक आहेत. मोठं दैनिक, मोठं पद पण पाय कायमच जमिनीवर आणि सतत लोकांच्या संपर्कात. त्यामुळेच त्यांचा मित्रपरिवारही तसाच मोठा. त्यांच्या मोठ्या मनासारखाच. कारण संदीप कोरोना संकटातच नाही तर कायमच कुणीही, कधीही, कुठेही संकटात आलं तर जणू आपलंच काम समजून धावतात. मदत करुनच स्वस्थ बसतात. पण पुन्हा काही कळतं आणि पुन्हा धावपळ सुरु होते. त्यांच्या मित्रपरिवाराकडे त्यांनी डॉक्टरांसाठी काही तरी केलं पाहिजे, हा प्रस्ताव मांडताच, तो उचलून धरला गेला. काय करावं, तर मग प्रत्येकालाच आवडणारे आंबे देण्याची कल्पना मांडली गेली. आणि काम सुरु झाले. संदीप आचार्यांच्या मित्र मंडळींनी झटपट जबाबदाऱ्या घेतल्या. कुणी आंब्यांची व्यवस्था केली. कुणी ते व्यवस्थित पॅक होतील ते पाहिले. आणि मग संदीप आचार्य मित्र मंडळ निघालं गोड गोड कामगिरीवर.
सुरुवात झाली ठाणे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व वॉर्डबॉय यांना तब्बल १०० आंब्याच्या पेट्या वाटून. नेहमी कामाचं ओझं घेऊन येणारी लोक त्या कर्मचाऱ्यांना सवयीची. ही गोड भेट मिळताच त्यांच्या चेहऱ्यांवर खुललेल्या समाधानाचा गोडवा वेगळाच होता. संदीप आचार्यांबद्दल असलेला विश्वास, गोड कृतज्ञतेचे महत्व यामुळे ज्यांना ज्यांना हे समजलं त्यांनी सहभागाची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे संदीप आचार्य व मित्रमंडळाला आणखी बळ आलं. ठाणे जिल्हा रुग्णालयापाठोपाठ ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात १०० हापूस आंब्याच्या पेट्या तेथील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांना देण्यासाठी ठाणे जिल्हा उपसंचालक डॉ गौरी राठोड यांना सुपूर्द केल्या. यावेळी डॉ अविनाश भागवत, डॉ श्रीमती खांडेपारकर तसेच अन्य डॉक्टर उपस्थित होते.
मुंबई महापालिकेच्या बीकेसी जम्बो कोरोना सेंटरमध्येही हे मित्रमंडळ पोहचले. अधिष्ठाते डॉ. ढेरे यांच्याकडे २०० आंब्याच्या पेट्या सोपवल्या. त्यानंतर शीव रुग्णालयात २०० आंब्याच्या पेट्या देण्यात आल्या. सध्या देशभर कोरोना नियंत्रणाच्या मुंबई मॉडेलचे कौतुक सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयही दाखला देत आहे. त्यामुळे प्रतिकात्मक म्हणून महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनाही आंब्याच्या पेट्या देण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत या मित्रमंडळाचा गोड गोड उत्साह एवढा की आता यादी वाढतच चालली. पुढील टप्प्यात नायर रुग्णालयात २०० आंब्याच्या पेट्या, वाडिया रुग्णालयात २०० पेट्या, जे जे रुग्णालय व सेंट जॉर्ज रुग्णालयात २०० आंब्याच्या पेट्या देणार आहेत. अर्थाच येथे थांबतील ते संदिप आचार्य कसले? त्यांना पुण्यातही अशीच गोड भेट द्यायची आहे. तेथेही जिल्हा रुग्णालयातील प्रत्येकी १०० ते २०० डॉक्टर, परिचारिका व वॉर्डबॉय यांना आंब्यांची सुमधुर कृतज्ञता-भेट दिली जाणार आहे. संदीप आचार्य आणि त्यांच्या मित्रमंडळींची इच्छा फक्त त्यांनी केलं त्यावर समाधान मानायची नाहीच. त्यांची इच्छा आहे की ते जसं मुंबई-ठाण्यात करत आहेत, तसेच इतरांनीही इतरत्र करावं. आपले जीव धोक्यात घालणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्य रक्षकांविषयी गोड गोड कृतज्ञता व्यक्त करावी. खात्री आहे, नक्कीच ही गोडी अशीच पसरेल.
संदिप आचार्य…संवेदनशीलतेनं लोकहित जपणारे पत्रकार!
• संदीप आचार्य हे मनानं जिवंत असणारे पत्रकार आहेत.
• आपलं पद, आपली प्रतिष्ठा यांचा अहंभाव न बाळगता सामान्यातील सामान्यासाठी ते सतत सक्रिय असतात.
• ते आपलं वजन वापरतात, पण स्वत:साठी नाही, तर जनहिताच्या चांगल्या योजना मार्गी लागाव्यात यासाठी.
• ते त्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही साकडं घालतात.
• खासदार कुमार केतकर यांच्या खासदार निधीमधून गेल्या वर्षी त्यांनी परळच्या वाडिया रुग्णालयात लहान मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे ५० लाख रुपयांचे मशिन दिले.
• आता ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या १० ग्रामीण रुग्णालयांच्या गरजांचा डॉक्टरांबरोबर बसून अभ्यास करून प्रत्येक रुग्णालयाला २५ लाख रुपये याप्रमाणे अडीच कोटी रुपयांचे प्रस्ताव कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून मिळवून दिले आहेत.
• संदीप आचार्यांच्या निस्वार्थ सामाजिक जाणिवेचा परिचय असल्याने खासदार केतकरही आवर्जून साथ देत असतात.
ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांच्या निस्वार्थी सेवाभावाला मुक्तपीठ टीमचा सलाम!
(सर्व काही चांगलं भूतकाळातच घडून गेलं, असा एक गैरसमज आहे, असतो. चांगली माणसं आजही आहेत. चांगलं काम आजही चालतं. माणसांमधील, मानवी जीवनातील याच चांगल्या बाजूंचा शोध घेत तेही समाजासमोर मांडणं आवश्यक आहे. वर्तमानात आजच्या पिढीतही आदर्श आहेत, ते दाखवण्याचा मुक्तपीठचा प्रयत्न आहे. कृपया आपल्या सभोताली असं चांगलं काम करणारी चांगली माणसं. चांगल्या संस्था असतील तर हक्कानं कळवा. राजकीय, सामाजिक विचारांचं कसलंही बंधन नाही. – संपर्क – ९८३३७९४९६१ – तुळशीदास भोईटे)